मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आलेल्या पैशांच्या उधळण प्रकरणाची चौकशी विशेष समितीकडून सुरू आहे. या चौकशीअंतर्गत पात्रता निश्चितीसाठी समितीने २७ फेब्रुवारी रोजी ११ अर्जदारांना सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र यावेळी एकही अर्जदार उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आता समितीने गुरुवारी, ६ मार्च रोजी पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन म्हाडाने ११ अर्जदारांना केले आहे. या अर्जदारांना ही शेवटची संधी असेल, असा इशाराही म्हाडाने दिला आहे.
विक्रोळी कन्नमावर नगर येथील ११ संक्रमण शिबिरार्थींना नवीन संक्रमण शिबिरात गाळे देण्यात आले नाहीत. दुरुस्ती मंडळाने २० वर्षे या संक्रमण शिबिरार्थींना गाळ्यांपासून वंचित ठेवले असा आरोप करीत एका महिलेने १४ फेबुवारी रोजी वांद्रे येथील म्हाडा भवनात अनोखे आंदोलन केले. म्हाडा भवनातील दुसऱ्या मजल्यावरील दुरुस्ती मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ यांच्या दालनात गळ्यात पैशांची माळ घालून आलेल्या या महिलेने चलनी नोटांची उधळण करून आंदोलन केले. यावेळी तिने वाघ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ११ गाळ्यांच्या वितरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली. या समितीने ११ अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याच्या अनुषंगाने त्यांची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या दिवशी एकही अर्जदार सुनावणीस उपस्थित राहिला नाही, अशी माहिती म्हाडाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
सुनावणीला एकही जण न आल्याने म्हाडा कर्मचाऱ्यांना अर्जदारांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवून सूचनापत्र देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्या पत्त्यावर अर्जदार नसल्याने त्यांना सूचनापत्र देता आली नाहीत. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने आता त्यांना शेवटची एक संधी देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. सुनावणीला अर्जदार यावेत यासाठी आता म्हाडाने वर्तमानपत्रात ११ अर्जदारांची नावे प्रसिद्ध करून त्यांना २७ मार्च रोजी सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आता गुरुवारी हे अर्जदार सुनावणीस उपस्थित राहतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण अर्जदार सुनावणीस उपस्थित न राहिल्याने आणि या ११ अर्जदारांमध्ये आंदोलनकर्त्या महिलेचा समावेश नसल्याने या प्रकरणाविषयी म्हाडामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.