मुंबई : म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयातील मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात एका महिलेने नुकतेच नोटांच्या माळा घालून व पैशांची उधळण करून अनोखे आंदोलन केले होते. या महिलेने संबंधित सहमुख्य अधिकाऱ्यांवर संक्रमण शिबिरातील गाळेवाटपांसंबंधी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणाची अखेर म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
आंदोलक महिलेने संक्रमण शिबिरातील ११ गाळ्यांच्या वाटपाबाबत आरोप केले होते. त्यामुळे, जयस्वाल यांनी या गाळ्यांच्या वाटपाबाबत एक समिती तयार केली आहे. या समितीने गाळेवाटपाची चौकशी करत १५ दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश जयस्वाल यांनी समितीला दिले आहेत. मात्र त्याचवेळेस महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित महिला संक्रमण शिबिरार्थी नसून ती अर्जदारही नाही, असेही म्हाडाने स्पष्ट केले आहे. तर समितीच्या अहवालाअंती आरोपात काही तथ्य आहे की नाही हे स्पष्ट होईल, अशी भूमिकाही म्हाडाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अखेर आता म्हाडाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती तयार केली आहे.
काय घडले?
गेल्या आठवड्यात शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास म्हाडा भवनातील दुसऱ्या मजल्यावर एक महिला आंदोलक नोटांची माळा गळ्यात घालून आली. या महिलेने दुरुस्ती मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ यांच्या दालनाबाहेर आंदोलनास सुरुवात केली. दालनात पैशांची उधळण केली. यावेळी तिने वाघ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याची आणि विष पिण्याचीही धमकी दिली. अखेर सुरक्षा रक्षकांनी या महिलेला म्हाडा भवनाबाहेर काढले आणि त्यानंतर संपूर्ण नाट्य संपले. मात्र, या प्रकरणामुळे म्हाडातील भ्रष्टाचाराची चर्चा सर्वत्र सुरू झाली.