मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर म्हाडामधील लोकशाही दिन जूनपर्यंत स्थगित करण्यात आला होता. जूनपासून लोकशाही दिनाला पुन्हा सुरुवात होणार होती. पण आता जुलैपासूनच लोकशाही दिनाला सुरुवात होणार आहे. राज्यात दोन शिक्षक आणि दोन पदवीधर अशा एकूण चार विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतर ८ जुलै रोजी लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.

म्हाडा रहिवासी, लाभार्थी आणि नागरिकांची अनेक कामे म्हाडामध्ये असतात. या कामानिमित्त अनेक तक्रारीही असतात. या तक्रारी, समस्यांचे निराकरण योग्य प्रकारे वा वेळेत होत नसल्याने म्हाडा रहिवासी, लाभार्थी, नागरिकांच्या समस्या आणखी वाढतात. ही बाब लक्षात घेता म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लोकशाही दिनाची अंमलबजावणी म्हाडाच्या पातळीवर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जानेवारीपासून लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा लोकशाही दिन पार पडतो. यावेळी लोकशाही दिनाच्या अनुषंगाने संगणकीय पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची सुनावणी जयस्वाल यांच्या समोर घेतली जाते. अर्जदारांच्या तक्रारीचे यावेळी तात्काळ निवारण करण्यात येते. त्यामुळे हा लोकशाही दिन नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

हेही वाचा – मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन? महापालिकेकडून झोपु प्राधिकरणाला कानपिचक्या

हेही वाचा – मुंबईत एकदाची बरसात सुरु! काळ्याकुट्ट ढगांची गर्दी!

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या लोकशाही दिनाला चांगला प्रतिसाद मिळाला, अनेकांच्या समस्यांचे निराकरण झाले. पण आचारसंहितेमुळे एप्रिल, मेमधील लोकशाही दिन स्थगित करण्यात आला होता. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर १० जून रोजी लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार होता. पण आता राज्यात दोन शिक्षक आणि दोन पदवीधर अशा एकूण चार विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आता थेट ८ जुलै रोजीच लोकशाही दिन होणार असल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले आहे.

Story img Loader