मुंबई : मुंबईतील रखडलेल्या १७ झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने कामाला वेग दिला आहे. त्यानुसार आता लवकरच म्हाडाचा मुंबईतील पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागणार आहे. जोगेश्वरीतील १५५० चौरस मीटर जागेवरील साई बाबा सहकारी नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या झोपु योजनेसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून अखेर इरादा पत्र (एलओआय) जारी करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे या झोपु योजनेचा मार्ग मोकळा झाला असून आता निविदा प्रक्रिया राबविण्याच्या कामाला मंडळाने सुरुवात केली आहे. लवकरच यासाठी निविदा जारी करण्यात येणार आहेत. दरम्यान, या झोपु योजनेअंतर्गत ८० झोपडीधारकांचे ३०० चौरस फुटांच्या घरात पुनर्वसन केले जाणर आहे. तर दुसरीकडे मुंबई मंडळाला अंदाजे ५०० चौरस फुटांची १०६ अतिरिक्त घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांची विक्री भविष्यात सोडतीद्वारे केली जाणार आहे.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपु योजना राबविण्यात येत आहे. मात्र अनेक विकासक या योजना अर्धवट सोडत आहेत वा झोपु योजनांची कामेच सुरू करत नसल्याने ५०० हून अधिक योजना रखडल्या आहेत. रखडलेल्या झोपु योजनांचा प्रश्न राज्य सरकारने नुकताच निकाली काढला. त्यानुसार या योजना एमएमआरडीए, म्हाडा, एमएसआरडीसी, महाप्रीत, सिडको आणि महानगरपालिकेसारख्या प्राधिकरण, महामंडळाकडे दिल्या आहेत. सरकारने म्हाडावर रखडलेल्या २१ झोपु योजनांची जबाबदारी सोपवली होती. मात्र यापैकी १७ योजनाच व्यवहार्य ठरल्या आहेत.

प्रकल्पबाधितांसाठी ४४ सदनिका

परिशिष्ट २ मार्गी लागल्याने मंडळाने पुढील कार्यवाही करून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ‘झोपु’ प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रकल्पासाठी नुकतेच मंडळाला इरादा पत्र प्राप्त झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. योजना मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाल्याने संबंधित विभागाने निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच या कामासाठी निविदा मागविण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या पहिल्या ‘झोपु’ योजनेद्वारे ८० झोपडीधारकांचे पुनर्वसन करतानाच येथे प्रकल्पबाधितांसाठी ४४ सदनिका उपलब्ध होतील.

१७ मजली इमारती

जोगेश्वरीतील या प्रकल्पाअंतर्गत १७ मजली पुनर्वसन इमारत बांधण्यात येणार असून यात ३०० चौरस फुटांच्या ८० सदनिका पात्र झोपडीधारकांसाठी असणार आहेत. तर ४० सदनिका प्रकल्पबाधितांसाठी असणार आहेत. त्याचवेळी मंडळाला सोडतीसाठी १०६ अतिरिक्त घरे उपलब्ध होणार आहेत. अंदाजे ५०० चौरस फुटांची ही घरे असणार असून सोडतीसाठीची स्वतंत्र १७ मजली इमारत असणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात जोगेश्वरीत म्हाडाची १०६ घरे अल्प गटाला उपलब्ध होणार असून ही बाब इच्छुकांसाठी दिलासादायक असणार आहे.