मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळ राबवित असलेल्या विशेष अभियानाची मुदत गुरुवारी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उर्वरित गिरणी कामगारांना आपली कागदपत्रे जमा करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, या विशेष मोहिमेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणेदोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी एक लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती झालेली नाही. असे असताना आता सोडतीआधीच या अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्देशानुसार घेतला आहे. यासाठी म्हाडाने १४ सप्टेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कामागरांकडून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत.

हेही वाचा…चालायला पदपथ आहेतच कुठे? बेकायदा फेरीवाल्यांवरील कारवाईवरून उच्च न्यायालयाचा प्रश्न

कामगार विभाग पात्रता निश्चिती करीत आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आतापर्यंत एक लाख ५० हजार ४८४ पैकी एक लाख ७ हजारांहून अधिक कामगार आणि वारसांनी कागदपत्रे जमा केली आहेत. तर ८२ हजाराहून अधिक कामगार – वारसदार पात्र ठरले आहेत. या विशेष मोहिमेला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी कागदपत्रे जमा करण्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी त्वरित कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना कागदपत्रे जमा करण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येण्यात येण्याची शक्यता सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधी लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada house scheme appeal to mill workers to submit documents for eligibility determination mumbai print news psg