मुंबई : महाडजवळील तळीये येथील कोंढाळकरवाडीमधील दरडग्रस्त आणि या परिसरातील धोकादायक क्षेत्रातील रहिवाशांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने तळीयेमध्ये २७१ घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील दरडग्रस्तांच्या ६६ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून १३४ घरांचे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यांमध्ये २७ घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र कोकण मंडळाला २७१ पैकी ४४ घरांसाठी अद्याप जागाच उपलब्ध झालेली नाही. या घरांसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी कोकण मंडळाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तळीयेमधील कोंढाळकरवाडी येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली आणि यात ८७ जणांचा मृत्यू झाला. कोंढाळकरवाडीतील ६६ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेनंतर दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी विविध सरकारी यंत्रणांवर सोपविण्यात आली. घरे बांधून देण्याची जबाबदारी म्हाडाच्या कोकण मंडळावर सोपविण्यात आली. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांवर घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची आणि जिल्हा परिषदेवर प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २०० घरांच्या निर्मितीसाठी कोकण मंडळाला जागा उपलब्ध करून दिली. या जागेवर सध्या २०० घरांचे बांधकाम सुरू असून यापैकी प्राधान्यक्रमाने दरडग्रस्तांच्या ६६ घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून ही घरे संबंधितांच्या ताब्यात देण्यासाठी सज्ज झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी संबंधितांना या घरांचा ताबा देण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीची गरज नाही, पाचपैकी फक्त एका कप्प्यात थोड्या दुरुस्तीची गरज

हेही वाचा – शहरी नक्षलवादाच्या आरोपाचे प्रकरण : घरी नजरकैदेत असलेले गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाकडून नियमित जामीन

मूळ आराखड्यानुसार तळीयेमध्ये २६३ घरांच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून या २६३ घरांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यानंतर यात आणखी आठ घरांची भर पडली. असे असताना कोकण मंडळाला २०० घरांच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध करण्यात आली. तेथे २०० घरांचे बांधकाम सुरू आहे. तर २७ घरांची जागा कंटनेरने व्यापली असून या कंटेनरमध्ये २५ दरडग्रस्त कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही २५ कुटुंबे पक्क्या घरात स्थलांतरित झाल्यानंतर कंटनेर हटवून २७ घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र उर्वरित ४४ घरांच्या निर्मितीसाठी जागेची प्रतीक्षा असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. ४४ घरांसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना विनंती प्रस्ताव पाठविला आहे. ही जागा उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित ४४ घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada is waiting for land for construction of 44 houses in taliye demand for land from raigad district collector mumbai print news ssb