बृहन्मुंबईतील ठिकठिकाणच्या ‘म्हाडा’ संक्रमण शिबिरांमध्ये वर्षांनुवर्षे आपल्या घराच्या प्रतीक्षेत खितपत पडलेल्या रहिवाशांची पात्रता ठरवण्याचे काम आता मार्गी लागले असून पहिल्या टप्प्यात १०१७ जणांची बृहद सूची (मास्टर लिस्ट) बुधवारी जाहीर होत आहे. वरिष्ठता आणि घराचे आकारमान यानुसार उपलब्ध घरांचे वाटप या सूचीतील रहिवाशांना होईल.
‘म्हाडा’ची मुंबईत शहर व उपनगरात ठिकठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत. त्यात सुमारे १९ हजार घरे आहेत. जुन्या मोडकळीस आलेल्या वा पडलेल्या इमारतीमधील वा पुर्नविकास होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना ‘म्हाडा’ या शिबिरांत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या संक्रमण शिबिरांत तब्बल ३० ते ३५ वर्षांपासून रहिवासी पुन्हा आपल्या मालकीच्या घरात जाण्याची प्रतीक्षा करत राहत आहेत.
 या संक्रमण शिबिरांत सुमारे आठ हजार घुसखोर असल्याची ‘म्हाडा’ची आकडेवारी होती. त्या पाश्र्वभूमीवर संक्रमण शिबिरांतील रहिवाशांची पात्रता यादी ठरवण्याचे काम ‘म्हाडा’च्या  इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने हाती घेतले होते.
त्यासाठी रहिवाशांकडून अर्ज मागवले असता फक्त सात-साडे सात हजार अर्जच आले. घुसखोर आठ हजार असतील तर सुमारे बारा हजार अर्ज यायला हवे होते. पण तसे न झाल्याने घुसखोरांची संख्या सुमारे बारा हजारच्या घरात जाण्याची शक्यता आहे.  
रहिवाशांचे अर्ज आल्यानंतर त्यांच्याकडील कागदपत्रे, पुरावे यांची छाननी करून व शहानिशा करून पात्र रहिवाशांची यादी तयार करण्याचे काम मार्गी लागले आहे.
त्यानुसार बुधवारी ‘म्हाडा’तर्फे १०१७ जणांची पहिली पात्रता यादी जाहीर होत आहे. तर ‘म्हाडा’कडे त्यांच्यासाठी ३३९ घरे तयार आहेत. त्यामुळे वरिष्ठता यादी आणि संबंधितांच्या घरांचा आकार यानुसार १०१७ रहिवाशांमधील लोकांना या ३३९ घरांचे वाटप होईल.

Story img Loader