सर्वसामान्यांसाठी घरांची बांधणी करण्याची जबाबदारी असलेल्या ‘म्हाडा’च्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात बांधकाम कार्यक्रमासाठी २४११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पैकी ६७४ कोटी ४० लाख रुपये हे मुंबईतील घरांच्या बांधकामासाठी ठेवण्यात आले आहेत. राज्यात यंदा सुमारे ५१०० घरे बांधण्याचे काम हाती घेण्याचा ‘म्हाडा’चा संकल्प असून त्यापैकी एकटय़ा मुंबईतच जवळपास ३३७९ घरे असतील.
‘म्हाडा’ने २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी एकूण ४८९७ कोटी ९९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडला असून तो ७३९ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प आहे. यावर्षी ‘म्हाडा’च्या तिजोरीत ४१५८ कोटी ४५ लाख रुपये जमा होतील व ४८९७ कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज आहे. आगामी वर्षांत २४११ कोटी २६ लाख रुपये घरांच्या बांधकामावर खर्च होतील. त्यापैकी ७०० कोटी ५८ लाख रुपयांची घसघशीत रक्कम भूसंपादनासाठी ठेवण्यात आली आहे. मुंबई मंडळातर्फे बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी ६७४ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद तर कोकण मंडळाच्या विरार बोळींज येथील प्रकल्पासाठी ३३७ कोटी नऊ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विरारमधील २ हजार ४८६ घरांचा प्रकल्प ‘म्हाडा’ने हाती घेतलेला आहे.
चालू वर्षांत गाळे विक्रीतून १४१७ कोटी ७९ लाख रुपये जमा होतील अशी अपेक्षा होती. पण गाळे विक्रीचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य न झाल्याने केवळ ८४० कोटी रुपये जमा होतील अशी अपेक्षा आहे. तसेच बांधकाम कार्यक्रमात २२४५ कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज होता. पण बांधकाम उद्दिष्टही साध्य होत नसल्याने तो खर्च अवघ्या १४७९ कोटी रुपयांपर्यंत आल्याचा सुधारित अंदाज आहे. जमीन खरेदीतील अपयशामुळे ही तफावत आली आहे.
मागील अर्थसंकल्पात बांधकाम कार्यक्रमासाठी २२४५ कोटी रुपये प्रस्तावित होते. पण बांधकाम कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याने सुधारित खर्च १४७९ कोटी रुपये दाखवण्यात आला आहे.
 ‘म्हाडा’च्या विविध मंडळांकडे एकूण ८४२१ गाळे वाटपाअभावी पडून आहेत. त्यात गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या ६९२५ गाळय़ांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा