मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया संपुष्टात आली आहे. त्यानुसार अर्जविक्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३१ हजार ४३३ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. तर अनामत रकमेसह अर्ज जमा करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ हजार ७५५ अर्ज दाखल झाले आहेत. आता ११ डिसेंबरला पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १३ डिसेंबरच्या सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल.
कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी १५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात झाली असून ७ नोव्हेंबरला या घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती. १८ ऑक्टोबरला अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत संपणार होती. मात्र १६ ऑक्टोबरला अर्जविक्री-स्वीकृतीस १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तर ७ नोव्हेंबरची सोडत १३ डिसेंबरवर गेली. अर्जविक्री-स्वीकृतीस प्रतिसाद मिळत नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आली.
हेही वाचा : Video: गोष्ट मुंबईची – मिठी नदीचे पाणी खाली येऊ नये म्हणून वापरले ‘हे’ तंत्र!
१५ नोव्हेंबरला अर्जविक्रीची मुदत संपली असून या मुदतीत ५३११ घरांसाठी ३१ हजार ४३३ अर्ज सादर झाले आहेत. तर शुक्रवारी, १७ नोव्हेंबरला अर्जस्वीकृतीची मुदत संपली असून या मुदतीत २४ हजार ७५५ अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाले आहेत. आता या अर्जांची छाननी सुरु असून ७ डिसेंबरला पात्र अर्जांची प्रारूप यादी तर ११ डिसेंबर पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सोडतीत किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल. तर १३ डिसेंबरला सोडत काढण्यात येईल.