मंगल हनवते, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने २०१८ मध्ये काढलेल्या सोडतीमधील खोणी आणि शिरढोणमधील घरांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच वेळी सोडतीतील बाळकुम गृहप्रकल्पातील घराच्या किंमतीत १६ लाख रुपयांनी वाढ केली असून घरांची किंमत कमी करण्यास म्हाडाने स्पष्ट नकार दिला आहे. खोणी-शिरढोणला झुकते माप आणि बाळकुमबाबत सापत्न भूमिका देणाऱ्या म्हाडाबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

हेही वाचा >>>मुंबई : तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले ; रोख १० लाख रुपये लुटून पोबारा

कोकण मंडळाने २०१८ मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील खोणी येथील २०३२, शिरढोण येथील १९०५ घरांचा (अत्यल्प गट), तसेच बाळकुममधील मध्यम गटातील १२५ घरांचा समावेश आहे. शिरढोणच्या घरांसाठी १६ लाख ८० हजार ९०० रुपये (अडीच लाख रुपयांचे अनुदान वगळत १४ लाख ३० हजार ९०० रूपये), खोणीतील घरांसाठी १८ लाख ८१ हजार ११२ रुपये ( अडीच लाख रुपयांचे अनुदान वगळत, १६ लाख ३१ हजार ११२ रुपये), तसेच बाळकुमधील १२५ घरांसाठी ४३ लाख ४५ हजार २३६ रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र या सोडतीच्या जाहिरातीत बाळकुममधील घरांच्या किंमतीत वाहनतळाची रक्कम समाविष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात वाहनतळाचा खर्च किंमतीत समाविष्ट करण्यात येईल आणि त्यासाठीची रक्कम विजेत्यांना म्हाडाला अदा करावी लागेल असे नमुद करण्यात आले होते. त्यानुसार कोकण मंडळाने काही दिवसांपूर्वी बाळकुमच्या घरांच्या किंमतीत वाढ केली. घराची किंमत चार-पाच लाख रुपयांनी वाढेल असे असे विजेत्यांना वाटत होते. परंतु त्यात थेट १६ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada konkan board reduce flat rate by 10 percent in khoni and shirdhon housing project by 10 percent mumbai print news zws