मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीचा कार्यक्रम बुधवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. ही सोडत २२६४ घरांसाठी असली तरी प्रत्यक्षात मात्र यातील १२३९ घरांचीच विक्री झाली आहे. १०२५ घरांना अर्ज प्राप्त न झाल्याने ही घरे रिक्त राहिली आहेत.

कोकण मंडळाने २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८, १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसह ११७ भूखंड अशा एकूण २२६४ घरांच्या सोडतीसाठी ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु केली होती. या सोडतीला प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीस अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार ७ जानेवारीला अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करत बुधवारी (५ फेब्रुवारी) दुपारी २ वाजता शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. या सोडतीत २४ हजार ९११ पात्र अर्जदार सहभागी झाले होते. मात्र त्यातील ९० टक्क्यांहून अधिक अर्जदारांनी २० टक्क्यांतील घरांसाठी अर्ज केले होते. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार २२६४ घरांपैकी १०२५ घरांसाठी अर्जच सादर न झाल्याने ही घरे रिक्त राहिली आहेत. सोडतीद्वारे केवळ १२३९ घरांची विक्री झाली आहे.

म्हाडा गृहनिर्माण योजनेतील शिरढोण येथील संकेत क्रमांक ४१२ मध्ये ५२८ घरे उपलब्ध होती. मात्र, या घरांसाठी केवळ ३२ अर्ज सादर झाले. त्यामुळे येथील ४९६ घरे रिक्त राहिली आहेत. संकेत क्रमांक ३५३ ए मधील ६५ घरांपैकी केवळ १५ घरांसाठी अर्ज सादर झाल्याने आणि त्यानुसार १५ विजेते घोषित झाल्याने तेथील ५० घरे रिक्त राहिली आहेत. १५ टक्के एकात्मिक योजनेतील संकेत क्रमांक ४१४ मधील २८३ घरांसाठी २४७ अर्जांनुसार २४७ विजेते घोषित झाल्याने येथील ३६ घरे रिक्त राहिली आहेत. तर १५ टक्के योजनेतील संकेत क्रमांक ४१५ मधील ५४२ घरांसाठी केवळ १७२ अर्ज आल्याने आणि त्यानुसार १७२ अर्जदार विजेते घोषित ठरल्याने येथील येथील ३७० घरे रिक्त राहिली आहेत. त्याचवेळी ११७ भूखंडांपैकी यावेळी ११० भूखंडांचीच विक्री झाली आहे. एकूणच २२६४ घरांच्या सोडतीत १२३९ घरांची विक्री झाली आहे. २० टक्के योजनेतील ५९४ पैकी केवळ एका घराला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे हे एक घर रिक्त राहिले आहे. मात्र २० टक्के योजनेलाच अर्जदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. तर दुसरीकडे म्हाडा गृहनिर्माण योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरांना मात्र अर्जदारांनी नापसंती दर्शवली. त्यामुळेच या दोन्ही योजनेतील घरे मोठ्या संख्येने रिक्त राहिली आहेत. आता त्यांचा समावेश पुढील सोडतीत करायचा का याबाबत लवकरच मंडळाकडून निर्णय घेण्यात येईल. दरम्यान बुधवारी २२६४ घरांपैकी किती घरांसाठी सोडत काढण्यात आली. किती घरे प्रतिसादाअभावी रिक्त राहिली, घरांना प्रतिसाद का मिळाला नाही याबाबत कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी संबंधित विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. तेव्हा ही माहिती जनसंपर्क विभागाकडून गुरुवारी उपलब्ध करुन दिली जाईल अशी माहिती दिली. मात्र म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार २२६४ घरांपैकी १२३९ घरांसाठी सोडत निघाली असून १०२५ घरे प्रतिसादाअभावी रिक्त राहिल्याचे स्पष्ट होत असल्याबद्दल विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

समूह पुनर्विकासाला चालना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

● म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसह गिरणी कामगार, डबेवाले, कामगार, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी घटकांसाठी मोठ्या संख्येने घरांची निर्मिती केली जाणार आहे. तर परवडणाऱ्या भाडेतत्त्वावरील घरांचीही निर्मिती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

● नियोजनबद्ध आणि योग्य विकास साधायचा असेल तर समूह पुनर्विकास अत्यंत गरजेचे आहे. छोट्या-छोट्या इमारतींचा पुनर्विकास करत पायाभूत सुविधांवर ताण टाकण्याऐवजी समूह पुनर्विकासाला चालना देत त्यावर भर दिल्यास नियोजनबद्ध विकास साधता येईल. त्यातूनच ठाण्यात सर्वात मोठा समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

Story img Loader