मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असतानाच आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ३१ जानेवारीची सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ती फेब्रुवारीत होणार आहे. लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळाकडून जाहिर केली जाणार आहे.
कोकण मंडळाने २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८, १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसह विखुरलेल्या ११७ अशा एकूण २२६४ घरांच्या सोडतीसाठी ऑक्टोबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती.या सोडतीसाठीची अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया ११ ऑक्टोबरपासून सुरू झाली. सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत १० डिसेंबरला संपुष्टात येणार होती. तर २७ डिसेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र १० डिसेंबरपूर्वीच मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आणि २७ डिसेंबरची सोडत थेट २१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याने सोडतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली.
हेही वाचा – एक रुपयात पीकविमा बंद? बोगस अर्ज, गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस
पहिल्या मुदतवाढीतही सोडतीला प्रतिसाद न मिळाल्याने अर्जविक्री-स्वीकृतीला पुन्हा, दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आणि २१ जानेवारीचा सोडत पुन्हा पुढे गेली. अर्जविक्री-स्वीकृतीला ७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत सोडतीसाठी ३१ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. दुसऱ्यांदा मुदतवाढ देणाऱया आणि सतत सोडतीची तारीख पुढे ढकलणाऱ्या मंडळाकडून सोडतीला ७ जानेवारीनंतरही मुदतवाढ देणार का असा प्रश्न होता. पण त्यानंतर कोणतीही मुदतवाढ न देता अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया ७ जानेवारीला संपुष्टात आणण्यात आली. या सोडतीसाठी २० हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले. त्यानंतर आता ३१ जानेवारी रोजी सोडत होणार असे वाटत असतानाच आता कोकण मंडळाने ३१ जानेवारीची सोडत पुन्हा पुढे ढकलली आहे. अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाली असून अर्जांची छाननीही पूर्ण झाली आहे. मात्र काही कारणाने सोडत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कोकण मंडळातील सूत्रांनी दिली. त्याला मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दुजोरा दिला आहे. सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहिर करण्यात येईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – मुंबई : महापालिकेचे ५८६ कर्मचारी निवडणूक कामातच, ४६ जणांचे वेतन रोखले
मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने सोडत लांबणीवर
मंडळाने ३१ जानेवारीला सोडत काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरु केली होती. सोडतीसाठी ठाण्यातील एक सभागृह निश्चित करून निमंत्रण पत्रिका छापण्याचीही तयारी झाली होती, असे असताना अचानक सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांची ३१ जानेवारीला वेळ न मिळाल्याने सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.