मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावरील ११ हजार १७६ घरांच्या विक्रीसाठी मंडळाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही विशेष मोहीम मंगळवारी संपुष्टात येणार होती. मात्र घरांसाठी मोठ्या संख्येने चौकशी करण्यात येत असल्याने मंडळाने अखेर या मोहिमेला तीन दिवसांची मुदतवाढ दिली. त्यामुळे आता शुक्रवारपर्यंत विशेष मोहीम सुरू राहणार असून २९ स्टाॅलच्या माध्यमातून घर विक्री आणि घरांची माहिती देण्याचे काम सुरू राहणार आहे. दरम्यान, या मोहिमेअंतर्गत जागेवरच मंडळाची ३०० हून अधिक घरे विकली गेली असून मंडळासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
कोकण मंडळाच्या विरार – बोळींज आणि इतर ठिकाणची १४ हजारांहून अधिक घरांची विक्री होऊ शकलेली नाही. ही घरे विकली जात नसल्याने कोकण मंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मंडळाने ही घरे विकण्यासाठी विविध पर्याय अवलंबिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. कोकण मंडळाच्या घरांची विक्री करण्यासाठी स्वत: इच्छुकांपर्यंत पोहचण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २ ते १० डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिमेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील विविध ठिकाणी २९ ठिकाणी स्टाॅल लावण्यात आले आहेत. या स्टाॅलवर मंडळाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून घरे विकण्यात येत आहेत.
हेही वाचा >>>मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
तसेच विविध ठिकाणी फलक लावण्यात आले असून १० रिक्षांमधून घरांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. ही मोहिम मंगळवारी संपणार होती. पण त्याआधीच या मोहिमेला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. ही मोहीम शुक्रवारपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.या मोहमेअंतर्गत आतापर्यंत सहा हजारांहून अधिक नागरिकांनी विचारणा केली आहे. तर जागेवर ३०० हून अधिक जणांनी अर्ज भरून घर खरेदी केले. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या मोहिमेला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचेही गायकर यांनी दिली.