बुधवारी मोहिमेचा शेवटचा दिवस
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य’ तत्वावरील ११ हजार १७६ घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाने २ डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत इच्छुक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २९ ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच रिक्षामधून घरांची माहिती दिली जात आहे. या मोहिमेला आठवड्याभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ५५०० हून अधिक इच्छुकांनी घरांची चौकशी केली असून यापैकी २५० जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आणखी काही इच्छुक अर्ज दाखल करतील, अशी मंडळाला अपेक्षा आहे. दरम्यान, बुधवारी या विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस असणार आहे.
हेही वाचा >>> RBI Governer : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ
विक्रीविना पडून असलेली रिक्त घरे मंडळासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. कोकणातील १४ हजारांहून अधिक घरे रिक्त असून यामुळे मंडळाला अंदाजे तीन हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. या घरांच्या विक्रीसाठी मंडळाने आता कंबर कसली आहे. त्यानुसार ११ हजार १७६ घरांची ‘प्रथम प्रधान्य’ तत्वाने विक्री सुरू केली. पण या घरविक्रीला म्हणावे तसे यश न मिळाल्याने शेवटी मंडळाला घरविक्रीसाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. या घरांची माहिती प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी, स्वत: इच्छुक ग्राहकांपर्यंत पोहचून त्यांना घरविक्रीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी मंडळाला अखेर विशेष मोहीम हाती घ्यावी लागली आहे. त्यानुसार २ डिसेंबरपासून विशेष मोहिमेला सुरुवात झाली असून बुधवार ११ डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
हेही वाचा >>> गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
या मोहिमेअंतर्गत २९ ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असून स्टाॅलवरील अधिकारी ग्राहकांना घरांची माहिती देत आहेत. इच्छुक ग्राहकांना घरखरेदीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर पथनाट्याच्या माध्यमातूनही अर्जसंख्या वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. ही मोहीम सुरू होऊन आठवडा झाला असून या आठवड्याभरात मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. आठवड्याभरात ५५०० हून अधिक जणांनी घरासाठी चौकशी केली आहे. यापैकी २५० जणांनी अनामत रक्कम अदा करून अर्ज दाखल केले आहेत. तर ५५०० पैकी आणखी काही जण लवकरच अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रतिसाद चांगला असल्याने या मोहिमेला बऱ्यापैकी यश मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, या मोहिमेला मुदतवाढ देण्याचा तूर्तास विचार नाही. मात्र रिक्त घरांची संख्या पाहता मोहिमेला मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.