मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. मुंबईतील ४ हजार ८३ घरांसाठी सोमवारी, २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून याच दिवसापासून नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. ती २६ जूनपर्यंत सुरू राहणार असून १८ जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाची शेवटची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती. यात केवळ २१७ घरांचा समावेश होता. 

वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरू आहे. मात्र, अनेक कारणांमुळे ती लांबणीवर पडत गेली. अखेर आता मंडळाने ४ हजार ८३ घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार सोमवार, २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मििलद बोरीकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

जाहिरात २२ मे रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर या दिवशीच अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तर अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम मुदत २६ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर स्वीकृती अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून १८ जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

 मंडळाच्या १८ जुलैच्या सोडतीत ४ हजार ८३ घरांचा समावेश आहे. यात अत्यल्प गटासाठी २ हजार ७८८, अल्प गटासाठी १ हजार २२, मध्यम गटासाठी १३२ आणि उच्च गटासाठी ३९ घरे आहेत. सोडतीमधील अत्यल्प गटात गोरेगावमधील पहाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील १ हजार ९४७, अ‍ॅन्टॉप हिलमधील ४१७ तर, विक्रोळीच्या कन्न्मवार नगरमधील ४२४ अशी एकूण २ हजार ७८८ घरे समाविष्ट आहेत. तर, अल्प गटात एकूण १०२२ घरे असून गोरेगावमधील पहाडी परिसरातील ७३६ घरांचा त्यात समावेश आहे. उर्वरित घरे दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाड नगर (मालाड), पत्राचाळ, जुने मागाठाणे (बोरिवली), चारकोप, कन्नमवार नगर, विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाडा आदी ठिकाणची आहेत. त्याच वेळी मध्यम गटासाठी मंडळाने १३२ घरे उपलब्ध करून दिली असून ही घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर), कांदिवली येथील आहेत. तसेच उच्च गटासाठी केवळ ३९ घरांचा समावेश असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, शीव, शिंपोली, तुंगा पवई आदी ठिकाणी आहेत. अत्यल्प गटासाठीच्या घरांच्या किमती ३० लाख ४४ हजार ते ४० लाख रुपयांपर्यंत आहेत.

पहाडीतील पीएमएवायमधील १ हजार ९४७ घरांची किंमत प्रत्येकी अडीच लाखांचे अनुदान वजा करून ३० लाख ४४ हजार रुपये अशी आहे.

* एकूण घरे ४०८३

* अत्यल्प – २७८८

* अल्प – १०२२

*  मध्यम – १३२

*  उच्च – ३८ 

* विखुरलेली – १०२ 

महत्त्वाचे ..

* जाहिरात-२२ मे नोंदणी

* अर्ज विक्री-स्वीकृती-२२ मे

* अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख – २६ जून

*  सोडतीची तारीख-१८ जुलै * सोडतीचे ठिकाण – रंगशारदा, वांद्रे, पश्चिम