मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील एक लाख १० हजारांहून अधिक अयशस्वी अर्जदारांना मंडळाकडून अनामत रक्कमेचा परतावा करण्यात आला आहे. मात्र ४२१ जण अद्यापही अनामत रक्कमेच्या परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. या अर्जदारांनी बँक खाते क्रमांक वा बँकेची इतर माहिती चुकीची दिल्याने त्यांच्या अनामत रक्कमेचा परतावा झालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी मुंबई मंडळाने ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढली होती. या सोडतीत एक लाख १३ हजारांहून अधिक अर्जदार सहभागी झाले होते. यापैकी केवळ २०१७ जण सोडतीत विजेते ठरले. तर एक लाख १० हजारांहून अधिक जण अयशस्वी ठरले. नियमानुसार या अयशस्वी अर्जरदारांना त्यांच्या अनामत रक्कमेचा परतावा करणे आवश्यक असते. त्यानुसार सोडतीनंतर काही दिवसातच अनामत रक्कमेच्या परताव्यास सुरुवात करण्यात आली आणि आतापर्यंत १ लाख १० हजारांहून अधिक अयशस्वी अर्जदारांना अमानत रक्कमेचा परतावा करण्यात आला आहे. दरम्यान, अयशस्वी अर्जदारांपैकी तब्बल ११०० अर्जदारांनी आपला बँक खाते क्रमांक वा बँकेशी संबंधित इतर माहिती चुकीची नोंदवल्याचे निर्दशनास आले. त्यामुळेच या अयशस्वी अर्जदारांना अनामत रक्कमेचा परतावा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाने ११०० जणांची यादी प्रसिद्ध करून त्यांना आवश्यक ती दुरूस्ती करण्यासंबंधीच्या सूचना केल्या होत्या.

हेही वाचा >>> प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मुंबईत दुचाकी प्रचारफेरीवर भर; नेते व कार्यकर्त्यांच्या गर्दीत उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

या सूचनेनुसार ६०० हून अधिक जणांनी संबंधित माहितीत आवश्यक ती दुरूस्ती केली असून त्यांना अनामत रक्कमेचा परतावा करण्यात आल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र अजूनही ४२१ जण अनामत रक्कमेच्या परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. या अयशस्वी अर्जदारांनी अद्यापही बँकेशी संबंधित माहिती अद्ययावत न केल्याने त्यांना अनामत रकमेचा परतावा करता आलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या ४२१ जणांनी शक्य तितक्या लवकर माहितीतील त्रुटी दूर करून अनामत रक्कमेचा परतावा करून घ्यावा, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Weather Update : नगरमध्ये पारा १२.६ अंशांवर; जाणून घ्या, राज्यभरात थंडी का वाढली

प्रतीक्षा यादी लवकरच कार्यान्वित

मुंबई मंडळाच्या २०३० पैकी २०१७ घरांसाठीच प्रत्यक्षात सोडत निघाली आहे. या २०१७ पैकी ४५० हून अधिक घरे विजेत्यांनी परत (सरेंडर) केली आहेत. परत करण्यात आलेल्या घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र सध्या मंडळातील संबधित अधिकारी – कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत. त्यामुळे निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada lottery 2024 in mumbai 421 unsuccessful applicants awaiting for refund of deposit amount mumbai print news zws