मुंबई : तब्बल एक लाख १३ हजार ५४२ अर्जदारांचे लक्ष लागलेली म्हाडाच्या मुंबई मंडळाची २०३० घरांसाठी मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोडत काढण्यात आली. अर्जदारांमध्ये सर्वसामांन्यांसह लोकप्रतिनिधी आणि कलाकारांचाही समावेश होता. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सुमारे २७ कलाकार सोडतीत सहभागी झाले होते. राजू शेट्टी यांच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार गौरव मोरे, निखिल बने, ‘बिग बाॅस २’ विजेता शिव ठाकरे यांचे मुंबईमधील हक्काच्या घराचे स्वप्न मंगळवारी पूर्ण झाले.

हेही वाचा >>> बुलेट ट्रेनच्या स्थानकांतील पायाभूत सुविधांच्या कामाला वेग; १२ स्थानकांमध्ये ९० सरकते जिने बसविणार

राजू शेट्टी यांनी पवईतील घरासाठी अर्ज केला होता. तीन घरांसाठी एकच, राजू शेट्टी यांचा अर्ज आल्याने त्यांना सोडतीआधीच घर लागले होते. केवळ याबाबतची औपचारीक घोषणा मंगळवारी सोडतीच्या निकालाच्या वेळी करण्यात आली. पवईतील घरासाठी राजू शेट्टी विजेते ठरले आहेत. तर दुसरीकडे गौरव मोरे याने पवईतील घरासाठी एकच अर्ज केला होता. एक अर्ज करूनही तो कलाकार कोट्याअंतर्गत पवईतील उच्च गटातील घरासाठी विजेता ठरला आहे. तसेच शिव ठाकरेही पवईतील उच्च गटातील घरासाठी विजेता ठरला आहे. त्याने पवईसह गोरेगावमधील उच्च गटातील घरासाठी अर्ज केला होता. निखिल बने यानेही दोनहून अधिक अर्ज सादर केले होते. निखिल बने विक्रोळी कन्नमवारमधील घरासाठी विजेता ठरला आहे.

हेही वाचा >>> आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या

झोपडपट्टीतून आता टाॅवरमध्ये

पवईतील फिल्टरपाडा झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालो. आजही तिथेच राहतो. मोठी स्वप्ने पाहायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा हे मी मनाशी पक्के ठरविले होते. त्यानुसार पवईत उत्तुंग इमारतीत घर घ्यायचे हे माझे स्वप्न होते. पवईतील बहुमजली इमारती पाहायचो आणि एक दिवस आपण झोपडपट्टीतून टाॅवरमध्ये जाणार असा निश्चय करायचो. शेवटी म्हाडाच्या माध्यमातून माझे हे स्वप्न आज पूर्ण होत आहे. झोपडपट्टी ते टाॅवर असा माझा प्रवास होणार असून हा प्रवास सुखावणारा आहे. माझा आणि माझ्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गौरव मोरे, कलाकार, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

स्वप्न पूर्ण झाले

मी मागील काही दिवस मुंबईत वास्तव्यास आहे. मुंबईत हक्काचे घर असावे असे माझे स्वप्न होते. परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे एकच माध्यम म्हणजे म्हाडा. त्यामुळे मी गोरेगाव आणि पवईतील घरासाठी अर्ज केला होता. मी आज पवईतील घरासाठी विजेता ठरलो आणि सर्वाधिक आनंदी आहे. मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होणे यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही. शिव ठाकरे, बिग बाॅस-२ विजेता

आता कार्यकर्ते आणि माझ्या राहण्याची सोय होईल

मुंबईत मी आणि माझे कार्यकर्ते नियमित येतो. अशावेळी राहण्याची योग्य सोय नसल्याने अडचण निर्माण होत होती. त्यामुळेच मी यावेळी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आणि आता सोडतीत मी विजेता ठरलो आहे. याचा मोठा आनंद आहे. त्याहीपेक्षा आता माझी आणि कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांची राहण्याची सोय होणार असल्याने ही बाब आमच्यासाठी अधिक आनंदाची आहे. राजू शेट्टी, माजी खासदार