मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ (१४ भूखंडासह) घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सोडतीसाठी आतापर्यंत कमी अर्ज सादर झाल्याने मुदतवाढ देण्याची वेळ कोकण मंडळावर आली. त्यानुसार आता १९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे, तर २१ एप्रिलपर्यंत अनामत रकमेसह अर्ज जमा करता येणार आहे. सोडतीच्या तारखेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोडत नियोजित वेळेनुसार १० मे रोजीच जाहीर होणार आहे.
कोकण मंडळाच्या २६०६ (१४ भूखंडांसह) घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला ८ मार्चपासून सुरुवात झाली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील २०४८ घरांसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला १७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत १० एप्रिलला तर अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची मुदत १२ मार्चला संपुष्टात येणार होती. पण आता मात्र अर्ज भरण्याची मुदत १९ एप्रिलला तर अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची मुदत २१ एप्रिलला संपणार आहे. या दोन्ही प्रक्रियांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सोडतीला खूपच कमी प्रतिसाद मिळाल्याने कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०११ मध्ये काढण्यात आलेल्या ८९८४ घरांच्या सोडतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी घरांसाठी तब्बल दोन लाख ४६ हजार अर्ज सादर झाले होते. मात्र त्यावेळी अर्जदारांना निवासी दाखल्यासह इतर कागदपत्रे, अर्ज भरताना सादर करावी लागत नव्हती. त्यामुळे प्रतिसाद मिळत होता. पण आता नव्या सोडत प्रक्रियेनुसार कागदपत्रे आधीच द्यावी लागत असल्याने इच्छुकांसाठी ही मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळेच १० मे रोजी होणाऱ्या सोडतीला कमी प्रतिसाद मिळाला.
कमी प्रतिसाद
८ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत (सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत) १२ हजार ३६० अर्ज अनामत रकमेसह सादर झाले आहेत. तर २२ हजार ३८० जणांनी अर्ज भरले आहेत. हा प्रतिसाद कमी असल्याने आणि अनेकांना कागदपत्रे मिळण्यास वेळ लागत असल्याने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच यासंबंधीची अधिकृत घोषणा कोकण मंडळाकडून केली जाणार आहे.