‘म्हाडा’च्या १२४४ घरांसाठीची सोडत शुक्रवार, ३१ मे रोजी होत असून सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत या ऑनलाइन सोडतीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे योजनेच्या संकेत क्रमांकानुसार अर्जदारांना सोडतीसाठी येता येईल. दरम्यान कागदपत्रांतील त्रुटीमुळे सोडतीमधून बाद होण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या ५९६१ पैकी सुमारे एक हजार अर्जदारांनी ‘म्हाडा’कडे दाद मागितली असून अंतिम यादी बुधवारी जाहीर होईल.
‘म्हाडा’ने यंदा १२५९ घरांसाठी जाहिरात काढली. त्यात बांधून तयार असलेल्या २५१ घरांचा समावेश आहे. ५७ घरांचे बांधकाम झाले असून भोगवटा प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. तर बांधकाम सुरू असलेल्या ९५१ घरांचा समावेश होता. पण जाहिरातीनंतर सोडतीमधील घरांच्या संख्येत बदल झाला. बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या संख्येत १५ घरांची कपात झाली असून आता ती संख्या ९३६ वर आली आहे. त्यामुळे यंदाची सोडत १२४४ घरांची असणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत होईल.
कागदपत्रांतील काही त्रुटींसाठी ‘म्हाडा’ने ५९६१ अर्जदारांचे अर्ज बाद करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यांना मंगळवारी दुपापर्यंत ‘म्हाडा’कडे दाद मागण्याची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे सोडतीसाठी पात्र अर्जदारांची यादी अंतिम करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे बुधवारी सकाळी ही यादी जाहीर होणार आहे. प्रवेशपत्रिका घेण्यासाठी अर्जदारांनी आपले ओळखपत्र व अर्जाची मूळ पावती सोबत आणावी.

सोडतीचे वेळापत्रक
*    सकाळी दहा ते दुपारी एक – संकेत क्रमांक २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, ३०१, १४८ ब, २३९ अ मधील घरांसाठी सोडत होईल. त्यांच्यासाठी निळय़ा रंगाची प्रवेशपत्रिका असेल. ती सभागृहस्थळी सकाळी आठ ते दहा या वेळेत मिळेल.
*    दुपारी दोन ते सायंकाळी पाच – संकेत क्रमांक २९९, ३००, २४९ अ, २५० अ, २५५ अ, २६५ अ, २६६ अ, २६७ अ, २६८ अ, २६९ अ, २७० अ, २७१ अ मधील घरांसाठी सोडत होईल. त्यांच्यासाठी लाल रंगाची प्रवेशपत्रिका असेल. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मिळेल.