मुंबई : म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या ११३३ घरांसह ३६१ भूखंडांच्या सोडतीला अखेर मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी ११ वाजता राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे.
छ. संभाजीनगर मंळाकडून फेब्रुवारीत ११३३ घरांसह ३६१ भूखंडांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत अर्जविक्री-स्वीकृती सुरु करण्यात आली होती. या सोडतीसाठी एकूण ४७५४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह ३९८९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४२५ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ७०८ सदनिका तसेच ३६१ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीतील सदनिका अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. तसेच भूखंड सर्व उत्पन्न गटातील अर्जदारांकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान मंडळाने काही कारणाने या सोडतीच्या सोडतपूर्व प्रक्रियेला २६ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र त्यानंतर सोडतीला काही मुहुर्त लागत नव्हता. त्यामुळे पात्र अर्जदारांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लांबली होती.
पण आता मात्र अखेर मंगळवारी ही सोडत प्रक्रिया पार पडणार असल्याने अर्जरांना दिलासा मिळाला आहे.आहे. दरम्यान https://www.vccme.in/chattrapati-sambhaji-nagar/ या लिंकवर अर्जदारांना वेबकास्टिंगच्या माध्यमातून व म्हाडाचे https://www.facebook.com/mhadaofficial या अधिकृत फेसबूक पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर सोडतीचा निकाल म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केला जाणार आहे.