पवई- तुंगा गाव, मागठाणे आणि चारकोपसह काही ठिकाणी तयार असलेल्या म्हाडाच्या एक हजार २०० घरांसाठी ३१ मे रोजी सोडत काढली जाणार आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून उपलब्ध होणार आहेत. यंदाही कोकण गृहनिर्माण मंडळांच्या घरांचा या सोडतीत समावेश असणार नाही.
२०११ तसेच २०१२ मध्ये निघालेल्या सोडतीतील घरांचा ताबा पालिकेने निवासी दाखला न दिल्याने म्हाडाने अद्याप दिलेला नाही. यशस्वी अर्जदारांना प्रत्यक्षात घरांचा ताबा मिळाला नसतानाही घरांसाठी काढलेल्या कर्जाचा हप्ता भरावा लागत आहे. त्यातच आता आणखी नव्या घरांसाठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे.
पवई- तुंगा गाव येथे अल्प तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी तब्बल हजार घरे उपलब्ध आहेत. या सोडतीत उच्च उत्पन्न गटासाठी १६४ घरांचा समावेश आहे. ही सर्व घरे तयार असल्याचा म्हाडाचा दावा असला तरी या घरांना पालिकेने निवासी दाखला दिला आहे किंवा नाही हे स्पष्ट केलेले नाही. या घरांच्या किमतीबाबत पुढील आठवडय़ात निर्णय होणार आहे.
या वेळीही ऑनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अनामत रकमेच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज संबंधित बँकेत सादर करावा लागतो. अनामत रक्कम नेटबँकिंगद्वारे भरल्यास अर्जदाराला बँकेत जाऊन अर्ज दाखलही करावा लागणार नाही. आधार कार्डही बंधनकारक नाही, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.