मंगल हनवते
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी गुरुवारपासून (५ जानेवारी) नोंदणी सुरू झाली आहे. पुणे मंडळाच्या ५९९० घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला ही सुरुवात झाली आहे. त्यासाठी २०१३ पासून ऑनलाइन नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली आहे. मात्र आता प्रक्रिया पूर्णतः बदलली आहे. नवीन प्रक्रिया, नोंदणी आणि संगणकीय प्रणाली नेमकी काय आहे आणि अर्ज कसा करायचा हे आज जाणून घेऊया…
म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल का?
म्हाडाच्या घरांचे वितरण करण्यासाठी, गरजूंनाच घरे मिळावीत यासाठी म्हाडाने सोडत प्रक्रिया स्वीकारली असून अनेक निकष आणि नियम ठरविण्यात आले आहेत. मात्र या प्रक्रियेत अनेकदा मानवी हस्तक्षेप होत होता. त्यामुळे म्हाडावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. त्यामुळे सोडत प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यासाठी म्हाडाने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया ऑनलाइन केली. मात्र त्यातही त्रुटी असल्याने आणि सोडतीनंतरची प्रक्रिया ऑनलाइन नसल्याने त्यातही मानवी हस्तक्षेप होत होता. वर्षभरापूर्वी मुंबई मंडळाचे तत्कालीन मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी संपूर्ण सोडत प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्याची संकल्पना पुढे आणली. म्हाडा आयटी सेलच्या मदतीने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असून याच नव्या प्रक्रियेसह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत निघत आहे.
विश्लेषण : देशातील ५० ऐतिहासिक स्मारकं गायब, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…
बदल काय?
आता सोडत पूर्व आणि सोडतीनंतरची संपूर्ण प्रकिया ऑनलाइन असेल. या प्रक्रियेत विजेत्यांना म्हाडाच्या कार्यालयातही जावे लागणार नाही. केवळ घराची चावी घेण्यासाठीच पात्र विजेत्याला म्हाडात यावे लागेल. नवीन बदलाचा विचार करता मुख्य बदल म्हणजे आता इच्छुकांना प्रत्येक वेळी सोडतीनुसार नोंदणी करण्याची गरज नाही. आता म्हाडाच्या सर्व सोडतींसाठी एकदाच नोंदणी करावी लागणार असून ती कायमस्वरूपी असेल. जोपर्यंत घर लागत नाही तोपर्यंत जाहीर होणाऱ्या सोडतीत अर्ज करता येणार आहे. मात्र नोंदणीतील माहितीत वेळोवेळी आवश्यक ते बदल करावे लागतील. आता सोडतीपूर्वीच अर्जदारांची पात्रता निश्चिती केली जाणार आहे. आतापर्यंत विजेत्यांचीच पात्रता निश्चिती होत होती आणि तीही सोडतीनंतर होत असे. पण आता सोडतीपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण होणार असून ती १०० टक्के ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे आता पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होतील. त्यामुळे सोडतीनंतर एका दिवसात घराचा ताबा मिळू शकेल. त्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घरांचाच सोडती समावेश करण्यात येईल.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
सोडतीतील विजेत्यांना पात्रता निश्चितीसाठी २१ प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागत होती. अनेकांना या कागदपत्रांची पूर्तता करणे अवघड होत होते. परिणामी अनेक विजेते अपात्र ठरत असत. पण आता ही पात्रता निश्चिती सोपी करण्यात आली असून केवळ सात कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. यात आधारकार्ड, पॅनकार्ड (मोबाइल क्रमांकाशी लिंक असलेले), वास्तव्याच्या पुरावा, अधिवासाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, सामाजिक आरक्षण असल्यास जात प्रमाणपत्र-जात पडताळणी प्रमाणपत्र आणि इतर आरक्षणासाठी (कलाकार, पत्रकार, सैनिक इत्यादी) आवश्यक ते प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे.
उत्पन्न मर्यादा काय असेल?
नव्या सोडत प्रक्रियेसह उत्पन्न मर्यादाही बदलण्यात आली आहे. त्यानुसार आता अत्यल्प गटासाठी वार्षिक ६ लाख रुपयांपर्यंत (प्रति महिना ५० हजार रुपये), अल्प गटासाठी ६,००,००१ ते ९,००,००० रुपयांपर्यंत, मध्यम गटासाठी ९,००,००१ ते १२,००,००० रुपयांपर्यंत आणि उच्च गटासाठी १२,००,००१ रुपये ते १८,००,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही उत्पन्न मर्यादा मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असेल. उर्वरित महाराष्ट्रासाठी अत्यल्प गटासाठी वार्षिक ४,५०,००० रुपये, अल्प गटासाठी वार्षिक ४,५०,००१ ते ७,५०,००० रुपये, मध्यम गटासाठी वार्षिक ७,५०,००१ ते १२,००,००० रुपये आणि उच्च गटासाठी १२,००,००१ ते १८,००,००० रुपये पर्यंत अशी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
विश्लेषण : सिनेमा हॉल्समध्ये पॉपकॉर्न महाग का असतात?
अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटाला किमान मर्यादा लागू करण्यात न आल्याने आता अत्यल्प गटातील अर्जदाराला अल्प, मध्यम आणि उच्च गटात अर्ज करता येणार आहे. तर अल्प गटातील अर्जदाराला मध्यम आणि उच्च गटात तसेच मध्यम गटातील अर्जदारांना उच्च गटात अर्ज करता येणार आहे. मात्र उच्च गटातील अर्जदार केवळ उच्च गटातच अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या अनामत रक्कमेतही वाढ करण्यात आली आहे. पुणे मंडळाने सर्व उत्पन्न गटासाठी ही रक्कम वाढविली असून कोकण मंडळही सर्व गटाच्या अनामत रकमेत वाढ करणार आहे. मुंबई मंडळही अनामत रक्कम वाढविणार आहे, पण मुंबई मंडळाने अत्यल्प आणि अल्प गटासाठी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेऊन या गटाला दिलासा दिला आहे. मध्यम आणि उच्च गटासाठी मात्र वाढ करण्यात येणार आहे.
मुंबई आणि कोकण मंडळाची सोडत कधी?
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे ते मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीकडे. कोकण मंडळाची दीड वर्षांपासून तर मुंबई मंडळाची चार वर्षांपासून सोडत निघालेली नाही. पण आता मात्र लवकरच त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कोकण मंडळाची सोडत याच महिन्यात तर मुंबई मंडळाची सोडत फेब्रुवारीअखेरीस जाहीर होणार आहे. मुंबई मंडळाची अंदाजे ४ हजार तर कोकणची अंदाजे २७०० घरे सोडतीसाठी असतील. पुणे मंडळाची सोडत जाहीर झाली असून त्यासाठीची नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली आहे.