निवासाच्या दाखल्यासंबंधीचा तांत्रिक अडथळा अखेर म्हाडाकडून दूर
मुंबई : म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी तसेच पुणे मंडळाच्या ५९९० घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र नवीन संगणकीय प्रणालीत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असल्याच्या, त्यातही निवासाचा दाखला सादर करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींचे अखेर म्हाडाने निवारण केले असून इच्छुकांना दिलासा दिला आहे. म्हाडाच्या निर्णयानुसार आता जुना निवासाचा दाखला असेल, त्यावर बारकोड नसेल तरी नोंदणीधारकांनी आपले सरकार या संकेतस्थळावर निवासाच्या दाखल्यासाठी अर्ज करावा आणि त्यानंतर प्राप्त होणारा टोकन क्रमांक नोंदवावा. हा टोकन क्रमांक ग्राह्य धरून निवासाच्या दाखल्याची पडताळणी पूर्ण करण्यात येणार आहे. या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल.
नव्या प्रक्रियेसह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह म्हाडाची सोडत नोंदणी तसेच पुणे मंडळाच्या घरांसाठीची सोडतपूर्व प्रक्रिया सुरु आहे. नोंदणी आणि अर्जविक्री, स्वीकृतीला ५ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. म्हाडाच्या कोणत्याही सोडतीसाठी अर्जविक्री, स्वीकृती सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच नोंदणी तसेच अर्जस्वीकृतीला (अनामत रक्कमेसह अर्ज सादर) मोठा प्रतिसाद मिळत असे. मात्र या नवीन प्रणालीत, प्रक्रियेत कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करणे शक्य होत नसल्याने वा बारकोड असलेली कागदपत्रे सादर करणे शक्य होत नसल्याने इच्छुकांना मोठ्या अडचणी येत आहेत. यासंबंधीच्या तक्रारी मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळेच नोंदणी आणि अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संथगतीने सुरु आहे.
निवासाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र-जात पडताळणी प्रमाणपत्र नवीन, बारकोडसह असणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना अनेकांकडे जुनी, बारकोड नसलेली प्रमाणपत्रे आहेत. त्यामुळे त्यांची नोंदणी प्रक्रिया अर्धवट अडकली आहे. नोंदणी पूर्ण होत नसल्याने पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येत नसल्याचे चित्र आहे. त्याची गंभीर दखल घेऊन अखेर म्हाडाने ही तांत्रिक अडचण दूर करून इच्छुकांना मोठा दिलासा दिला आहे. म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नवीन, बारकोड असलेला निवासाचा दाखला तसेच जात प्रमाणपत्र-जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरी इच्छुकांना चिंता करण्याची गरज नाही. कारण आता नोंदणी करतानाच एक लिंक दिली जाणार आहे. त्या लिंकवर जाऊन आपले सरकार या संकेतस्थळावर निवासाचा दाखला आणि इतर कागदपत्रांसाठी अर्ज करून टोकन क्रमांक घ्यावा, हा टोकन क्रमांक नोंदणी, अर्जस्वीकृतीसाठी ग्राह्य धरला जाईल आणि संबंधिताची नोंदणी पूर्ण केली जाईल. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. एकूणच हा मोठा दिलासा आता ठरणार असून नोंदणीला, अर्जविक्री-स्वीकृतीला वेग येईल.
पुणे सोडतीसाठी आतापर्यंत केवळ १५ अर्ज?
पुणे मंडळाच्या अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात होऊन पाच दिवस झाले तरी अर्जस्वीकृती मात्र संथगतीने सुरु असल्याचे चित्र आहे. कारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत (९ जानेवारी) केवळ ८५ जणांनी अर्ज भरले असून यातील केवळ १५ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. कागदपत्रांची पूर्तता, वाढलेली अनामत रक्कम आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी होणारा विलंब यामुळे अर्जस्वीकृती संथगतीने सुरु असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत ६ फेब्रुवारीला संपणार आहे.