मुंबई : MHADA Houses Lottery 2023 म्हाडाच्या सुमारे १० हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. यात पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या अंदाजे साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या अंदाजे ६०० घरांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळांतील घरांच्या सोडतीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठी सोडत काढण्यात येईल असे जाहीर केले. त्यानुसार पुणे मंडळातील पाच हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. या सोडतीच्या जाहिरातीची तयारी पूर्ण झाली असून २५ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जाहिरात प्रसिद्ध होताच २५ ऑगस्टपासूनच अर्ज विक्री – स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> MHADA Lottery: पुण्यातील म्हाडाच्या पाच हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत; ‘या’ तारखेपासून अर्ज विक्री-स्वीकृती

या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे कोकण मंडळानेही चार हजार घरांच्या सोडतीच्या जाहिरातीच्या कामाला वेग दिला आहे. ठाणे, विरार – बोळिंज, डोंबिवली आणि अन्य ठिकाणच्या अंदाजे साडेचार हजार घरांसाठी ऑगस्टअखेरीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. औरंगाबाद मंडळानेही अंदाजे ६०० घरांसाठीच्या सोडतीच्या जाहिरातीसाठीची तयारी सुरू केल्याची माहिती औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी दिली. औरंगाबाद, आंबेजोगाई आणि लातूरमधील घरांचा यात समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच दसऱ्याच्या मुहूर्तावर इच्छुकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada lottery will be released in october for 10 thousand houses in konkan pune aurangabad amy