मुंबई : Mumbai Mhada Houses winners म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीतील ३,५१५ पात्र विजेत्यांना सोमवारी ऑनलाईनद्वारे तात्पुरती देकार पत्रे वितरित करण्यात आली. या पत्रानुसार ४५ दिवसांमध्ये (१९ ऑक्टोबरपर्यंत) विजेत्यांना सदनिकेच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे. मात्र समाज माध्यमांवर म्हाडाने ४५ दिवसांत १० टक्के रक्कम भरण्याची मुभा दिल्याचा संदेश फिरत आहे. ही माहिती चुकीची असून विजेत्यांना १० टक्के रक्कम भरून केवळ गृहकर्जासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याची मुभा देण्यात आली आहे. उर्वरित १५ टक्के रक्कम विहित मुदतीत (४५ दिवसात) भरावी लागणार आहे. अन्यथा घर रद्द होण्याची शक्यता आहे.
सोडतीनंतर पात्र विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र पाठवून ४५ दिवसांमध्ये घराच्या किंमतीपैकी २५ टक्के, तर त्यापुढील ६० दिवसांमध्ये ७५ टक्के रक्कम भरून घेण्यात येते. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी ४५ दिवस आणि पुढील १५ दिवसांच्या मुदतवाढ मिळाल्यानंतर २५ टक्के रक्कम न भरल्यास घर रद्द करण्यात येते. पुढील ६० दिवसांत वा ९० दिवसांच्या मुदतवाढीत उर्वरित ७५ टक्के रक्कम न भरल्यास घर रद्द करण्यात येते. असे असताना म्हाडाने १० टक्के रक्कम भरण्याची मुभा दिल्याचा संदेश समाज माध्यमात फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
हेही वाचा >>> MHADA Lottery: अखेर प्रतीक्षा संपली! पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आजपासून अर्जविक्री-स्वीकृती; ‘या’ तारखेपासून सोडत
म्हाडाच्या इतिहासात पाहिल्यांदाच सोडतीनंतर २० दिवसांत रक्कम भरून घेऊन घरांचा ताबा देण्यात येत आहे. विजेत्यांना २५ टक्के रक्कम इतक्या कमी कालावधीत जमा करणे वा गृहकर्ज उपलब्ध करून घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक विजेत्यांनी ४५ दिवसात १० टक्के, तर उर्वरित ६० दिवसात ९० टक्के रक्कम भरण्याची मुभा देण्याची मागणी केली होती. म्हाडाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ४५ दिवस आणि त्यापुढे अतिरिक्त १५ दिवसांची मुदतवाढ मिळाल्यास या कालावधीत २५ टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. अन्यथा घर रद्द होईल, अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महत्त्वाचे म्हणजे ९० टक्के गृहकर्ज मिळण्याची हमी देणारे बँकेचे पूर्वपरवानगी पत्र देणाऱ्या विजेत्यांना सुरुवातीला १० टक्के रक्कम भरून गृहकर्जासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची मुभा आधीपासूनच सोडत प्रक्रियेत समाविष्ट आहे. असे असताना याच तरतुदीचा फायदा घेऊन म्हाडाने ४५ दिवसांत १० टक्के रक्कम भरण्याची मुभा दिल्याची, मागणी मान्य झाल्याची माहिती समाज माध्यमातून पसरवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकाराची म्हाडाने गंभीर दखल घेतली आहे. समाज माध्यमांवरील हा संदेश चुकीचा, दिशाभूल करणारा आहे. या संदेशाला बळी पडू नये आणि विहित मुदतीत घराची रक्कम भरावी, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.