लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने बृहतसूचीवरील २६५ घरांसाठी २६ डिसेंबर २०२३ रोजी संगणकीय पद्धतीने सोडत काढली होती. या सोडतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर अवघ्या आठवड्याभरानंतर म्हाडाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आता सोडतीला गुरुवारी एक वर्ष पूर्ण होत असून चौकशी सुरू होण्याच्या प्रक्रियेलाही १५ दिवसांत एक वर्ष पूर्ण होणार आहे. असे असताना अद्यापही दुरुस्ती मंडळाकडून चौकशीचा अंतिम अहवाल सादर झालेला नाही.

दरम्यान या चौकशीत ५३ विजेते संशयित आढळले असून या विजेत्यांच्या घरांचे वितरण रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे दुरूस्ती मंडळाकडून मागील कित्येक महिन्यांपासून सांगितले जात आहे. मात्र यासंबंधीचीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. दुरूस्ती मंडळाच्या या कारभारावर तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

आणखी वाचा-बीकेसी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला, पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास वेगवान

दुरूस्ती मंडळाने काढलेल्या बृहतसूचीवरील २६५ घरांच्या सोडतीत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा ठपका असलेल्या अर्जदाराचा समावेश करण्यात आला होता. हा अर्जदार चार घरांसाठी विजेता ठरला होता. यासंबंधीची तक्रार ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पेठे यांनी सोडतीनंतर अवघ्या काही दिवसांत म्हाडा उपाध्यक्षांकडे केली. या तक्रारीनंतर तात्काळ या विजेत्याच्या घराचे वितरण रद्द करून सोडतीतील सर्वच्या सर्व विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेश उपाध्यक्षांनी दिले. सोडतीतील या गैरप्रकाराची चौकशीही सुरू करण्यात आली. एक-दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करून दोषींविरोधात कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र या चौकशीला आता एक वर्ष पूर्ण होत आले तरी दुरूस्ती मंडळाकडून अंतिम चौकशी अहवाल सादर झालेला नाही. याबाबत पेठे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान या चौकशीदरम्यान अंदाजे ५३ विजेते संशयित आढळले होते. या संशयितांविरोधात कडक कारवाई करून त्यांची घरे रद्द करणे अपेक्षित होते. म्हाडा उपाध्यक्षांनीही अशा कारवाईचे संकेत दिले होते. मात्र या संशयित विजेत्यांविरोधातही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याविषयी दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारदार सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले. दरम्यान, शंभरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी कोणतीही माहिती दिली नाही.

आणखी वाचा-लाचखोरीप्रकरणात प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल, सीबीआयची कारवाई

म्हाडाच्या या कारभारावर पेठे यांनी नाराजी व्यक्त केली. चौकशी अहवाल तात्काळ सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबत म्हाडाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आता गृहनिर्माण मंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंबंधी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader