मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळीतील मूळ भाडेकरुंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. तर नुकताच या इमारतींना निवासी दाखलाही प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता या पुनर्वसित इमारतीतील ६२९ घरांच्या वितरणाचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार या घरांसाठी १६ फेब्रुवारीला सोडत काढण्यात येणार होती. मात्र काही कारणाने ही सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ही सोडत २६ फेब्रुवारीला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्राचाळीतील ६७२ घरे २००८ मध्ये रिकामी करून घरे पाडण्यात आली. त्यानंतर पुनर्विकासाला सुरुवात करण्यात आली. मात्र पुनर्विकासाला सुरुवात झाल्यानंतर काही वर्षातच हा प्रकल्पात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले आणि हा प्रकल्प वादात अडकला. त्यानंतर विकासकाविरोधात कठोर कारवाई करून हा प्रकल्प त्याच्याकडून काढून घेत मुंबई मंडळाकडे वर्ग करण्यात आला. मुंबई मंडळाने २०२२ मध्ये मूळ भाडेकरूंसाठीच्या १६ पुनर्वसित इमारतींच्या कामाला सुरुवात करून काम पूर्ण केले. या इमारतींना नुकताच निवासी दाखला प्राप्त झाल्याने या घरांच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार ६२९ घरांची १६ फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी एकूण ६७२ घरांपैकी ६२९ घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती. ६७२ पैकी ६२९ मूळ भाडेकरूंनी मंडळाकडे कागदपत्रे जमा करून पात्रता निश्चित पूर्ण केली आहे. उर्वरित भाडेकरूंची पात्रता निश्चिती न झाल्याने या घरांसाठी सोडत न काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

मंडळाने १६ फेब्रुवारीला सोडत काढण्याच्यादृष्टीने तयारी सुरु केली होती. मात्र आता अचानक सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ही सोडत २६ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सोडत पुढे ढकलण्याचे नेमके कारण मंडळाकडून देण्यात आलेले नाही. पण आता २६ फेब्रुवारीला सोडत काढून कोणत्या भाडेकरूंना कुठे घरे द्यायची हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे ही सोडत मूळ भाडेकरूंसाठी महत्त्वाची असणार आहे. मार्चअखेरपर्यंत मूळ भाडेकरूंना घराचा ताबा मिळण्याची शक्यता असून त्यांची १७ वर्षांपासूनची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

मूळ भाडेकरू नाराज

मुंबई मंडळाने ६२९ घरांसाठी २६ फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सोडतीला मूळ भाडेकरूंचा विरोध आहे. ६२९ नव्हे तर ६७२ घरांसाठी सोडत काढून ज्या घरांसाठी पात्रता निश्चिती झालेली नाही ती सोसायटीच्या ताब्यात द्यावीत अशी आमची मागणी असल्याची माहिती पत्राचाळीतील मूळ भाडेकरूंनी दिली. तसेच काॅर्पस फंडाची रक्कम वाढविण्यासह आमच्या अन्य काही मागण्या असून या मागण्यांचा विचार मंडळाकडून केला जात नसल्यामुळे मूळ भाडेकरूंनी नाराजी व्यक्त केली आहे.