लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीसाठी रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९८ हजार ५०० अर्ज भरले गेले आहेत. त्यातील अनामत रक्कमेसह दाखल झालेल्या अर्जांची संख्या ७२ हजारांच्या घरात गेली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आठवड्याभराचाच कालावधी शिल्लक आहे.
मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी २२ मे पासून अर्जविक्री – स्वीकृतीस सुरुवात झाली. सोडतीच्या जाहिरातीनुसार अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची मुदत २६ जूनला संपणार होती. आरटीजीएस – एनईएफटीसह अनामत रक्कमेसह अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २८ जून होती. मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना मंडळाने अर्जविक्री – स्वीकृतीला १२ जुलैपर्यंत (आरटीजीएस- एनईएफटीसह अनामत रक्कम भरणे) मुदतवाढ दिली. अर्जविक्री – स्वीकृतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आणि अनेकांना अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला मिळण्यास काही कारणाने विलंब होत असल्याने सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली.
आणखी वाचा-समृद्धी महामार्गावर २१ हजार वाहनांची तपासणी; मात्र अपघात रोखण्यात अपयश
मुदतवाढ दिल्यामुळे अर्जांची संख्या एक लाखांचा टप्पा पार करत आहे. दरम्यान अर्जांची संख्या दीड लाखांच्या घरात तर अनामत रक्कमेसह दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या एक लाखांच्या पुढे जाईल असा विश्वास मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.