लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील विजेत्यांना मंडळाकडून प्रथम सूचना पत्र ऑनलाईन पाठविण्यात आले आहे. तर सर्व विजेत्यांना ऑनलाईन स्वीकृती पत्रही पाठविण्यात आले आहे. त्यानुसार विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. स्वीकृतीपत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थात २९ किंवा ३० ऑगस्टला विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र पाठविण्यात येणार आहे.
मुंबईतील ४०८२ घरांसाठी १४ ऑगस्टला सोडत काढण्यात आली. या सोडतीत एक लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी झाले होते. पण त्यातील केवळ ४०८२ अर्जदार विजेते ठरले आहेत. अयशस्वी ठरलेल्या एक लाख १६ हजार अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा करण्यास सुरुवात केली आहे. तर गुरुवारी विजेत्यांना ई प्रथम सूचना पत्र पाठवित विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्याचवेळी विजेत्यांना ई स्वीकृती पत्रही पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार विजेत्यांना घराची स्वीकृती किंवा घर परत (सरेंडर) करणार हे कळवायचे आहे. यासाठी मंडळाने विजेत्यांना १७ ते २७ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत जे स्वीकृती करतील त्यांना २९ वा ३० ऑगस्टपासून तात्पुरते देकार पत्र पाठविण्यात येणार आहेत. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या सदनिकांच्या विजेत्यांना हे पत्र पाठवायचे कि सरसकट ४०८२ विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र पाठवायचे हे लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. पत्र पाठविल्यानंतर विजेत्यांना ४५ दिवसात सदनिकेच्या एकूण किमतीच्या २५ टक्के भरावी लागेल तर त्यानंतर पुढील ६० दिवसात उर्वरित ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्याचवेळी जे लवकरात लवकर घराची १०० टक्के रक्कम आणि मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, देखभाल शुल्क भरणाऱ्याला तात्काळ घराचा ताबा दिला जाणार असल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आणखी वाचा-मुंबई: बीडीडीतील झोपडीपट्टी आणि दुकानदारांच्या पात्रता निश्चितीचा मार्ग मोकळा
सोडतीनंतर एका महिन्यांत आत घराचा ताबा मिळणार आहे. याआधी घराला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले असले तरी सोडतीनंतर पात्रता निश्चिती करत पुढील प्रक्रिया पूर्ण करत घराचा ताबा देण्यासाठी किमान एक ते दीड वर्ष लागत असे. तर अनेकांना ताबा मिळण्यासाठी वर्षांनुवर्षे वाट पाहावी लागल्याचे चित्र आहे. यावेळी मात्र गोरेगाव पहाडी आणि अन्य ठिकाणच्या भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घरांचा ताबा येत्या काही दिवसातच विजेत्यांना मिळणार आहे. अगदी साडे सात कोटींचे महागडे घरही ताबा देण्यासाठी सज्ज आहे. तर म्हाडा गृहप्रकल्पातील अँटॉप हिल आणि कन्नमवार नगरमधील घरांना भोगवटा प्रमाणपत्र घेण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे या घरांचा ताबाही पुढील काही दिवसात देणे शक्य होणार आहे. मात्र ३३(५) अंतर्गत सोडतीत समाविष्ट असलेल्या दादरमधील स्वगृह सोसायटीतील ७५ घरांच्या विजेत्यांना घराच्या ताब्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ही घरे निर्माणधीन प्रकल्पातील असून या घरांचे काम डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे या घरांचा ताबा २०२५ मध्ये मिळण्याची शक्यता आहे.