मुंबई : मुंबईतील पोलिसांच्या सेवानिवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. लहानशा घरात पोलिसांना राहावे लागत आहे. मुंबईत सेवानिवासस्थाने अपुरी पडत आहेत. एकूणच पोलिसांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण आता मात्र लवकरच म्हाडा ४,७५० पोलिसांना नवीन इमारतीत ४८० ते ६५० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे देणार आहे. म्हाडाच्या १७ अभिन्यासातील पोलीस सेवानिवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने घेतला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुनर्विकास प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी वास्तुरचनाकाराची नियुक्ती केली आहे. लवकरच आराखडा अंतिम करून प्रत्यक्ष पोलीस सेवा निवासस्थानांच्या पुनर्विकासाला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. मंडळाचे मुंबईत १०७ अभिन्यास आहेत. अनेक अभिन्यासातील घरे सेवानिवासस्थान म्हणून मंडळाने महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाला दिली आहेत. या सेवानिवासस्थांची पुरती दुरवस्था झाली असून त्यांचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. त्यामुळे आता या पोलिसांच्या सेवानिवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळावर सोपविण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार मंडळाने मुंबईतील १७ अभिन्यासातील ४,७५० पोलिसांच्या निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. या १७ अभिन्यासात बिंबिसार नगर, वनराई, पंतनगर, कुर्ला, मजासवाडी, टागोरनगरसह अन्य अभिन्यासातील सेवा निवासस्थानांचा समावेश आहे. १७ अभिन्यासात ४,७५० सेवानिवासस्थाने असून यातील अंदाजे १५०० सेवानिवासस्थाने दुरवस्थेमुळे रिकामी करण्यात आली आहेत. तर उर्वरित निवासस्थानांत पोलीस राहत असले तरी त्यांची दुरवस्था झाली आहे.
४८० ते ६५० चौरस फुटांची घरे
या पुनर्विकासाअंतर्गत ४८० ते ६५० चौरस फुटांची ४,७५० घरे बांधून ती महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला अतिरिक्त घरे उपलब्ध होणार असून या घरांची विक्री सोडतीद्वारे केली जाणार आहे. ही घरे नेमकी किती असतील हे आराखडा अंतिम झाल्यानंतरच स्पष्ट होईल. एकूणच पोलिसांना मुंबईत मोठी आणि उत्तुंग इमारतीत ४,७५० सेवानिवासस्थाने उपलब्ध होणार आहेत.