मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या आँगस्ट २०२३ च्या ४०८२ घरांच्या सोडतीतील प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मंडळाने या सोडतीतील प्रततीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीवरील ३१२ विजेत्यांना शुक्रवारी आँनलाईन स्वीकृती पत्राचे वितरण करण्यात आले आहे. आता या विजेत्यांना घराची स्वीकृती वा घर परत करण्याबाबतचा निर्णय आँनलाईन पद्धतीने कळविण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत जे घराची स्वीकृती देतील त्यांना पुढे तात्पुरते देकार पत्र वितरीत करत त्यांच्याकडून घराचा ताबा घेण्यासंदर्भातील पुढील प्रक्रिया पूर्ण करुन घेतली जाणार आहे.
मुंबई मंडळाकडून १४ आँगस्ट रोजी ४८२ घरांसाठी सोडत काढण्यात आली. या सोडतीतील ३५१५ पात्र विजेत्यांना ५ सप्टेंबर रोजी तात्पुरते देकार पत्र पाठवित त्यांच्याकडून घरांची २५ टक्के वा संपूर्ण रक्कम भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्याचवेळी दुसरीकडे घर नाकारलेल्या अर्थात परत (सरेंडर) केलेल्या विजेत्यांच्या जागी आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याच्या प्रक्रियेस शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकार्याने दिली. या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार एकूण विजेत्यांपैकी अंदाजे ४३७ विजेत्यांनी थेट घरे नाकारली आहेत. त्यामुळे नाकारलेल्या या घरांसाठी नियमानुसार प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
४३७ घरे थेट नाकारली असली तरी ४३७ पैकी केवळ ३१२ घरांसाठीच प्रतीक्षा यादीवरील विजेते जाहिर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील या ३१२ विजेत्यांना शुक्रवारी स्वीकृती पत्र वितरीत करण्यात आली आहेत. प्रतीक्षा यादीवरील ३१२ विजेत्यांना आता येत्या १० दिवसांत स्वीकृती वा घर परत करणार याबाबतचा निर्णय आँनलाईन पद्धतीने स्वीकृती पत्राद्वारे कळवावा लागणार आहे. जे घरास स्वीकृती देतील त्यांना पुढे घराचे वितरण करण्यात येणार आहे. एकूणच प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात आल्याने प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल.