मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने बृहतसूचीतील (मास्टर लिस्ट) अंदाजे १०० घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत काढण्याचे दुरुस्ती मंडळाचे नियोजन आहे. वर्षानुवर्षे दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या अंदाजे १०० संक्रमण शिबिरार्थींचे हक्काच्या घराचे स्वप्न या सोडतीमुळे पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
दक्षिण मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतीतील अतिधोकादायक वा कोसळलेल्या इमारतीतील मूळ भाडेकरुंना दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येते. मात्र मोठ्या संख्येने मूळ भाडेकरुंना वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरातच रहावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. मूळ भाडेकरुंच्या इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही कारणाने होऊच शकत नसल्याने त्यांना संक्रमण शिबिरातच रहावे लागते. अशा भाडेकरुंना हक्काची घरे देण्यासाठी दुरुस्ती मंडळाने बृहतसूची तयार केली असून विकासकांकडून मिळालेल्या अतिरिक्त घरांचे वितरण या भाडेकरुंना सोडतीद्वारे केले जाते.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत
म्हाडाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात बृहतसूचीवरील १०० घरांसाठी सोडत काढून घरांचे वितरण करण्याचा कार्यक्रम नमूद आहे. त्यानुसार आता कृती आराखड्यातील हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टीने घरांची शोधाशोध करून १०० घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ही सोडत काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जानेवारीत अर्ज केलेल्यांना संधी नाही
दुरुस्ती मंडळाने जानेवारीत बृहतसूचीवरील घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली होती. मात्र जानेवारीत अर्ज केलेल्या भाडेकरुंचा एप्रिलमध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीत समावेश नसणार आहे. तर त्याआधी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या अर्जदारांना या सोडतीत समाविष्ट करून त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एकूणच सव्वा वर्षांनंतर बृहतसूचीवरील घरांसाठी सोडत निघणार असल्याने मूळ भाडेकरुंसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे.
सोडतीतील गैरप्रकाराची चकशी सुरूच
सोडत प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने, बृहतसूचीवरील घरांच्या वितरणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असल्याने आता संगणकीय पद्धतीने बृहतसूचीवरील घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार डिसेंबर २०२३ मध्ये पहिली संगणकीय सोडत काढण्यात आली. मात्र संगणकीय सोडतीतही गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी मागील सव्वा वर्षांपासून सुरू आहे. सव्वा वर्षे झाले तरी अद्याप गैरप्रकाराचा अहवाल दुरुस्ती मंडळाकडून म्हाडाकडे सादर झालेला नाही. अशात आता दुसरी संगणकीय सोडत काढण्याची तयारी दुरुस्ती मंडळाने सुरू केली आहे.