मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील विजेत्यांना लवकरच तात्पुरते देकार पत्र पाठविण्यात येणार आहे. यानंतर विजेत्यांना ४५ दिवसांत घराच्या एकूण किमतीच्या २५ टक्के रक्कम भरावी लगणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील विजेत्यांना या अटीनुसार अंदाजे साडेसात लाख रुपये भरावे लागणार आहेत. इतकी मोठी रक्कम कमी वेळात जमा करणे शक्य नसल्याने कोकण मंडळाच्या धर्तीवर पीएमएवायसह सर्व उत्पन्न गटांतील घरांसाठी २५-७५ टक्के ऐवजी १०-९० टक्के अशा टप्प्यात रक्कम आकारावी अशी मागणी होत आहे.
म्हाडाच्या सोडतीच्या नियमानुसार पात्र विजेत्यांना देकार पत्र पाठवून त्यांच्याकडून घराची रक्कम भरून घेतली जाते. देकार पत्र मिळाल्यापासून ४५ दिवसांत ही रक्कम भरणे बंधनकारक असते. त्यानंतर पुढील १५ दिवसांची मुदतवाढ दिली जाते. पण त्यावर व्याज आकारले जाते. एकूणच या कालावधीत २५ टक्के रक्कम न भरल्यास घर रद्द होते. २५ टक्के रक्कम भरल्यानंतर पुढील ६० दिवसांत विजेत्यांना ७५ टक्के रक्कम भरावी लागते. या वेळेत रक्कम न भरणाऱ्या विजेत्याला व्याज आकारून ९० दिवासांची मुदतवाढ दिली जाते. या कालावधीत ७५ टक्के रक्कम न भरल्यास घर रद्द केले जाते. या नियमानुसार आता सप्टेंबरपासून ४०८२ विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र पाठवून रक्कम भरून घेऊन घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान कोकण मंडळाकडून मात्र १० टक्के आणि ९० टक्के अशा टप्प्यांत रक्कम भरून घेतली जाते. यासाठी तशी तरतूद कोकण मंडळाकडून करून घेण्यात आली आहे.
हेही वाचा – दहीहंडीला खेळाचा दर्जा नाहीच!; तांत्रिक अडचणीमुळे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन प्रलंबित
हेही वाचा – सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रद्द; बँकेकडून तांत्रिक कारण
मुंबई मंडळाच्या सोडतीत यावेळी २४ लाखांपासून थेट साडेसात लाख रुपयांपर्यंतच्या घरांचा समावेश आहे. त्यातही यावेळी वार्षिक तीन लाख रुपये उत्पन्न असलेले विजेते असताना त्यांच्यासाठीच्या पीएमएवायमधील घरांची किंमत ३० लाख ४४ हजार रुपये अशी आहे. त्यामुळे या विजेत्याला गृहकर्ज मिळविताना मोठ्या अडचणी येत आहेत. पण त्याचवेळी साडेसात लाख रुपयांच्या २५ टक्के रक्कम ४५ दिवसांत कशी उभारायची असा प्रश्न अनेक विजेत्यांना पडला आहे. तर कोट्यवधी किमतीच्या घरासाठीच्या विजेत्यालाही २५ टक्के रक्कम जमविणे अवघड जात आहे. दरम्यान याआधी सोडतीनंतर पात्रता निश्चिती व्हायला बराच कालावधी लागत होता. तर मोठ्या संख्येने घरे ही निर्माणाधीन प्रकल्पातील असायची. त्यामुळे रक्कम भरण्यासाठी, जमा करण्यासाठी विजेत्यांना बराच वेळ मिळत होता. पण आता मात्र सोडतीआधीच विजेत्यांची पात्रता निश्चिती झाली आहे. तर २८०० हुन अधिक घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे सोडतीनंतर अवघ्या दोन महिन्यांत विजेत्यांना २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे आता विजेत्यांनी कोकण मंडळाप्रमाणे १० आणि ९० टक्के याप्रमाणे रक्कम भरण्याची मुभा द्यावी अशी मागणी करण्यात आल्याचे एका विजेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार उपाध्यक्षांना असल्याचे सांगून हात झटकले.