मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील ३५०० हून अधिक विजेत्यांना सोमवारी मुंबई मंडळाकडून तात्पुरते देकारपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले. या देकारपत्रानुसार आता विजेत्यांना ४५ दिवसांत २५ टक्के, तर त्यापुढील ६० दिवसांत ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घराच्या १०० टक्के रक्कमेसह मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क भरणाऱ्या विजेत्याला तात्काळ घराचा ताबा दिला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने विजेते हक्काच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मुंबई मंडळाने १४ ऑगस्ट रोजी ४०८२ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीत ४०७८ अर्जदार विजेते ठरले. चार घरांसाठी प्रतिसादच न मिळाल्याने त्यांची विक्री होऊ शकली नाही. नव्या सोडत प्रक्रियेनुसार अर्जदारांची पात्रता सोडतीआधीच निश्चित झाली आहे. त्यामुळे मंडळाने सोडतीनंतर अवघ्या २० दिवसांत तात्पुरते देकार पत्र वितरीत केले आहे. ४०७८ पैकी ७७ विजेत्यांनी खोटी माहिती दिल्याने त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. याप्रकरणाची लवकरच सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचवेळी ७० विजेत्यांनी स्वीकृत पत्रच सादर केलेले नाही. त्यामुळे लवकरच त्यांची घरे रद्द करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ३९८ विजेत्यांनी घरे परत केली असून त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देऊन त्यांना स्वीकृती पत्र वितरीत करण्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा – धक्कादायक! मुंबईत २५ वर्षीय एअरहोस्टेसची गळा चिरून हत्या, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात
एकूणच ४०७८ पात्र विजेत्यांपैकी स्वीकृती पत्र सादर न केलेले, घरे परत केलेले, खोटी माहिती दिल्याबाबत नोटीस बजावलेले विजेते वगळता अंदाजे ३५३३ विजेत्यांना सोमवारी ऑनलाईन पद्धतीने तात्पुरते देकार पत्र वितरीत करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आता या विजेत्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत सदनिकेच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम (अनामत रक्कम वजा करन) भरावी लागणार आहे. या मुदतीत रक्कम न भरणाऱ्यास मागणीनुसार १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. मात्र यासाठी व्याज आकारले जाणार आहे. या ४५ वा ६० दिवसांत (१५ दिवसांच्या मुदतवाढीसह) २५ टक्के रक्कम न भरणाऱ्यांचे घर तात्काळ रद्द केले जाणार आहे. त्यामुळे विजेत्यांनी आता तात्काळ घराची २५ टक्के रक्कम विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे. विहित मुदतीत २५ टक्के रक्कम भरणाऱ्यांना त्या पुढील ६० दिवसांत ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. मात्र मुदतीत ७५ टक्के रक्कम भरू न शकणाऱ्या विजेत्यांना मागणीनुसार ९० दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असून यासाठी व्याज आकारले जाणार आहे. महत्त्वाचे एकूण १९५ दिवसांत (मुदतवाढीसह) घराची १०० टक्के रक्कम न भरल्यास घर रद्द होणार आहे.
हेही वाचा – महारेरा मानांकन ‘सारणी’ म्हणून ओळखले जाणार, दर सहा महिन्यांनी मानांकन सार्वजनिक होणार
दुसरीकडे निवासी दाखला मिळालेली घरे विजेत्यांना ताबा देण्यासाठी तयार आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जो विजेता घराची १०० टक्के किंमत, मुद्रांक, नोंदणी, देखभाल शुल्क भरेल त्याला तात्काळ घराचा ताबा दिला जाणार असल्याचेही मंडळातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान निवासी दाखला नसलेल्या घरांच्या विजेत्यांना देकारपत्र पाठविण्यात आले असून दादरमधील स्वगृह प्रकल्पातील ७५ घरे वगळता उर्वरित घरांना येत्या काही दिवसांत निवासी दाखला मिळणार आहे. असे असले तरी स्वगृहसह सर्वच संकेत क्रमांकातील पात्र विजेत्यांना देकार पत्र पाठविण्यात आले आहे. स्वगृहमधील विजेत्यांना चार टप्प्यांत रक्कम भरायची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता २५ टक्के रक्कम भरून घेतली जाणार आहे. मात्र त्यांना घराचा ताबा मिळण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.