मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीतील २०१७ विजेत्यांपैकी ४५ विजेत्यांनी घरांसाठी स्वीकृती दिलेली नाही. त्यामुळे या विजेत्यांना शेवटची संधी म्हणून मंडळाने आता आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार या विजेत्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत स्वीकृती पत्र सादर करवे लागणार आहे.
मंडळाने ८ ऑक्टोबर रोजी काढलेल्या सोडतीतील २०१७ विजेत्यांना मंडळाने स्वीकृती पत्र वितरित केले होते. त्यानुसार १५३० विजेत्यांनी घरांसाठी स्वीकृती दिली आहे. तर ४४२ विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत. तर ४५ जणांनी स्वीकृती वा घरे परत करण्याबाबत काहीच कळविलेले नाही. त्यामुळे या विजेत्यांना शेवटची एक संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. आता या विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. २९ ऑक्टोबरपासून या मुदतीस सुरुवात झाली असून ५ नोव्हेंबरला मुदत संपुष्टात येणार आहे. या मुदतीत जे विजेते स्वीकृती देतील त्यांना तात्पुरते देकार पत्र वितरित केले जाणार आहे. जे स्वीकृती देणार नाहीत त्यांचे घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे या शेवटच्या संधीचा लाभ घेत घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या विजेत्यांनी पुढे यावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.