लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: नुकत्याच जाहीर झालेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८३ घरांच्या सोडतीत दादरमधील ७५ घरांचा समावेश आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात अल्प आणि मध्यम गटातील या ७५ घरांचा समावेश आहे. या घरांचे बांधकाम डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे मंडळाने विजेत्यांकडून या घरांची विक्री किंमत चार टप्प्यांत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हाडाने संपूर्ण सोडत प्रक्रियेत बदल केला असून या बदलानुसार सोडतीत म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पातील निवासी दाखला मिळालेल्याच घरांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोडतीनंतर शक्य तितक्या लवकर विजेत्यांना घरांचा ताबा मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, घराचा ताबा मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे म्हाडावर टीका होत होती. पण म्हाडाला घराची रक्कम मिळण्यासही विलंब होत होता. त्यामुळे म्हाडाला आर्थिक फटका बसत होता. निवासी दाखला मिळालेल्या आणि विक्रीस तयार असलेल्या घरांची सोडत काढायची आणि त्यानंतर काही महिन्यातच विक्री रक्कम जमा होईल या मुख्य उद्देशाने म्हाडाने हा निर्णय घेतला आहे. पण १८ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीत मात्र मंडळाने या निर्णयाला छेद दिला आहे. या सोडतीत दादरच्या लोकमान्य नगर परिसरातील स्वगृह प्रकल्पातील ७५ घरांचा समावेश आहे. ही घरे मध्यम आणि अल्प गटातील आहेत. या घरांच्या किंमती एक कोटी ६५ लाख ३६ हजार ९५७ रुपये ते दोन कोटी ३२ लाख ५८ हजार ५८३ रुपयांदरम्यान आहेत. उत्पन्न मर्यादा आणि घरांच्या किंमती यात मोठी तफावत असल्याने ही घरे अल्प आणि मध्यम गटाला परवडणार कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर विजेत्यांची उत्पन्न मर्यादा पाहता त्यांना गृहकर्ज कसे मिळणार आणि ही घरे कोणाला परवडणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. ही घरे श्रीमंतांकडून लाटण्यात येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा-मुंबई: तडीपार गुंड पोलीस ठाण्यात ब्लेड घेऊन आला आणि…
ही घरे चालू बांधकाम प्रकल्पातील असून या घरांची रक्कम चार टप्प्यांत वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घरे मुंबई मंडळाला विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत मिळाली आहेत. या घरांचे बांधकाम सुरू असून डिसेंबर २०२४ मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांना या घरांचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे मंडळाने विजेत्यांकडून घरांची विक्री किंमत चार टप्प्यांत वसूल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. नियमानुसार तात्पुरते देकार पत्र मिळाल्यानंतर पुढील ४५ दिवसांत घराच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के, तर उर्वरित ७५ टक्के रक्कम पहिल्या टप्प्यानंतर पुढील ६० दिवसात भरणे बंधनकारक आहे. एकूणच या १०५ दिवसात रक्कम न भरल्यास निश्चित व्याज आकारून ९० दिवसांची मुदतवाढ दिली जाते. पण त्यानंतर मात्र घराचे वितरण रद्द करण्यात येते. दादर, ॲन्टॉप हिल, कन्नमवार नगर, जुना मागाठाणे, अंधेरी आणि अन्य काही ठिकाणच्या घरांना निवासी दाखला मिळालेला नाही. पण यापैकी दादर वगळता इतर सर्व घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून या घरांसाठी निवासी दाखला मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोडत होईपर्यंत या घरांना निवासी दाखला मिळेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दादरमधील घरांचा ताबा डिसेंबर २०२४ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घरांच्या विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र मिळाल्यापासून ४५ दिवसांत २५ टक्के, त्यानंतर चार महिन्यांत २५ टक्के आणि दुसरा टप्प्याची रक्कम भरल्यानंतर चार महिन्यांनी २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तर उर्वरित २५ टक्के रक्कम घराचा ताबा घेण्यापूर्वी भरावी लागणार आहे.