लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठीच्या सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे सोमवारी दुपारी ३ वाजता अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यास स्पष्ट होईल. त्याबरोबरीने सोडतपूर्व प्रक्रिया संपुष्टात येईल. ही प्रक्रिया संपल्यानंतर आठवड्याभरात सोडत काढली जाते. पण यावेळी पहिल्यांदाच सोडत प्रक्रिया पूर्ण झाली तरी सोडतीची तारीखच जाहीर झालेली नाही.
मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी २२ मे पासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु झाली. अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया २८ जुलैपर्यंत सुरु राहणार होती. तर १२ जुलैला अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते. सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून १८ जुलैला सोडत काढण्यात येणार होती. मात्र काही कारणाने या सर्व प्रक्रियेस २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि परिणामी १८ जुलैची सोडत रद्द झाली. नवीन वेळापत्रकानुसार आता अर्जविक्री-स्वीकृती पूर्ण झाली असून अंदाजे एक लाख २२ हजार अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा… मुंबईत संततधार, आज काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता
अर्जांची प्रारूप यादीही प्रसिद्ध झाली असून अंदाजे एक लाख १८ हजार अर्जदार आतापर्यंत सोडतीसाठी पात्र ठरले आहेत. तर आज दुपारी ३ वाजता अंतिम यादी जाहीर होईल आणि सोडतपूर्व प्रक्रिया संपेल. असे असताना सोडत कधी निघणार हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. मंडळाने अजूनही सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. सोडतीची तारीख जाहीर करा अन्यथा अनामत रक्कमेवर व्याज द्या अशी मागणी अर्जदारांनी केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढू असे मंडळाकडून सांगितले जात आहे, मात्र तारीख काही जाहीर करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांना सोडतीसाठी वेळ मिळेना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत काढण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी मागील कित्येक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न मंडळाकडून सुरु आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळच मिळत नसल्याने सोडत रखडल्याची चर्चा आहे.