मुंबई : म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ५०२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार शुक्रवार, ७ मार्च रोजी अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात येणार होती. मात्र काही कारणाने आता या प्रक्रियेस २१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना २१ मार्चपर्यंत सोडतीसाठी अनामत रक्कम अदा करून अर्ज भरता येणार आहे.
विकासकांकडून नाशिक मंडळाला २० टक्के योजनेतील घरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र म्हाडा प्राधिकरण आणि नाशिक मंडळ सातत्याने ही घरे मिळविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेसह विकासकांकडे पाठपुरावा करीत आहे. या पाठपुराव्यामुळे नाशिक मंडळाला नुकतीच २० टक्क्यातील ५०२ घरे उपलब्ध झाली. या घरांसाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध करून ७ फेब्रुवारीपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ५०२ घरांसाठी दोन भागात अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. २०२ घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यअंतर्गत, तर ३०० घरांसाठी नियमित सोडत काढण्यात येणार आहे. या ५०२ घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया ७ मार्चला संपुष्टात येणार होती. मात्र याआधीच गुरुवार, ६ मार्च रोजी नाशिक मंडळाने या प्रक्रियेला २० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र मुदतवाढीचे कोणतेही कारण मंडळाकडून देण्यात आलेले नाही.
मुदतवाढीनुसार आता इच्छुकांना २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत संगणकीय पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. तर २१ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज सादर करता येणार आहे. तसेच आरटीजीएल-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम अदा करून अर्ज भरण्याची मुदत २१ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. त्यानंतर सादर अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून पात्र अर्जदारांची अंतिम यादी ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात ५०२ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. मात्र सोडतीची तारीख मंडळाने अद्याप निश्चित केलेली नाही. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले.