मुंबई : म्हाडाकडून राज्यभरात मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. त्याचवेळी म्हाडाकडून विविध विभागीय मंडळांच्या माध्यमातून गृहप्रकल्पात दुकाने बांधली जातात वा छोटी व्यासायिक संकुले बांधून त्यातील गाळ्यांची विक्री केली जाते. पण आता पहिल्यांदाच म्हाडाने सर्वात मोठे १६ मजली व्यावसायिक संकुल बांधण्यात येत आहे. पुण्यातील ताथवडे येथे १३० कोटी रुपये खर्च करून हे संकुल बांधण्यात येणार असून मार्च २०२६ पर्यंत संकुलाचे काम पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. या संकुलाच्या विक्रीतून पुणे मंडळाला एक हजार कोटी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
पुणे मंडळाने दहा-बारा वर्षांपूर्वी ताथवडे येथे एक मोठा भूखंड विकत घेतला आहे. या भूखंडावर मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आला असून या गृहप्रकल्पातील घरांची विक्री सध्या सुरू आहे. याच भूखंडावरील गृहप्रकल्पालगत मंडळ व्यावसायिक संकुलही बांधत आहे. या व्यावसायिक संकुलाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा म्हाडाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प आहे. १०,०३,५७४.३३ चौ. फूट जागेवर १६ मजली व्यावसायिक संकुल उभारण्याच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. बी. जी. शिर्के कंपनीला या संकुलाच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणाने प्रकल्पास विलंब झाला. आता मात्र या प्रकल्पाच्या कामास वेग देण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>>Best Bus Accident: कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसटीएम परिसरात एकाला चिरडले
अंदाजे १३० कोटी खर्चाच्या या संकुलाचे आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दीड वर्षात पूर्ण होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर लवकरच या संकुलातील जागेची विक्री ई – निविदा पद्धतीने केली जाणार आहे. या संकुलातील जागेच्या विक्रीतून मंडळाला एक हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दोन महिन्यांत संकुलातील जागेच्या विक्रीसाठी स्वारस्य निविदा
या १६ मजली व्यावसायिक संकुलाचे बांधकाम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र या संकुलातील जागेची विक्री प्रक्रिया त्याआधीच पूर्ण करण्यात आली असून संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ जागेचा ताबा निविदेतील पात्र कंपन्यांना, व्यक्तिंना देण्याचे नियोजन मंडळाचे आहे. त्यामुळे यासाठी ई – निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने मंडळ कामाला लागले आहे. येत्या दोन महिन्यांत यासाठी स्वारस्य निविदा मागविल्या जाण्याची शक्यता आहे. स्वारस्य निविदेनंतर प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया राबवून संकुलातील जागेची विक्री केली जाणार आहे. दरम्यान, या संकुलात गाळे बांधण्यात आलेले नाही. प्रत्येक मजल्यावर ६० ते ६५ हजार चौरस फुटांची जागा मोकळी सोडण्यात आली असून याच जागेची विक्री केली जाणार आहे. निविदेत बाजी मारणाऱ्यांना आपल्या गरजेनुसार कार्यालय, दुकानांची रचना करता यावी ही बाब लक्षात घेऊन संकुलात गाळे पद्धतीने बांधकाम करण्यात आलेले नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.