मुंबई : कामाठीपुरा पुनर्विकासाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला असून या आराखड्यानुसार या पुनर्विकासाअंतर्गत १०० टक्के अधिमूल्य (प्रीमियम) पर्यायाद्वारे म्हाडाला अंदाजे १२०० कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या पर्यायानुसार ६०० कोटी रुपये महसूल आणि दक्षिण मुंबईत सोडतीसाठी अंदाजे १२०० घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा आराखडा राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ बांधकामासाठी निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबईतील ७७,९४५.२९ चौरस मीटर जागेवर कामाठीपुरा वसले असून या कामाठीपुऱ्यातील सर्व इमारती मोडकळीस आल्या आहेत.त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. मंडळाने कामाठीपुऱ्याचे सर्वेक्षण पूर्ण केले असून व्यवहार्यता अभ्यासास मान्यता घेऊन या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडाही तयार केला आहे. माहिमतुरा कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागाराने आराखडा पूर्ण करून नुकताच तो म्हाडा प्राधिकरणाला सादर केल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.
हेही वाचा…Hit and Run case : मिहीर शाहच्या अटकेनंतर संजय राऊत यांचा गंभीर आरोप, “रक्तात नशेचा अंश…”
म्हाडाकडे सादर झालेल्या हा आराखडा राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या आाखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…अकरावी प्रवेशाची दुसरी यादी आज
लवकरच निविदा प्रक्रिया
म्हाडाकडे सादर झालेल्या आराखड्यानुसार कामाठीपुरा पुनर्विकासाच्या माध्यमातून १०० टक्के अधिमूल्याचा अर्थात प्रीमियमच्या पर्यायाद्वारे म्हाडाला १२०० कोटी रुपये इतका महसूल मिळण्याची शक्यता आहे. तर ५० टक्के अधिमूल्य आणि ५० टक्के गृहसाठा पर्यायाद्वारे ६०० कोटी रुपये महसूल आणि सोडतीसाठी अंदाजे १२०० घरे मिळण्याची शक्यता आहे. कोणता पर्याय अंतिमत: स्वीकारला जाईल यावर म्हाडाला किती महसूल वा घरे मिळतात हे स्पष्ट होईल. शक्य तितक्या लवकर या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे नियोजन आहे.