मुंबई : पनवेल, कोनमधील ९०० विजेत्या गिरणी कामगारांना लवकरच म्हाडाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. २०१८ ते २०२२ दरम्यान घराची विक्री किंमत भरलेल्या विजेत्यांचे देखभाल शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई मंडळाचा आहे. या प्रस्तावास मंगळवारी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार आता लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर करत देखभाल शुल्कमाफी दिली जाणार आहे.
मुंबई मंडळाकडून २०१६ मध्ये पनवेल, कोनमधील २४१७ घरांसाठी सोडत काढण्यात आली. त्यानुसार विजेत्यांची पात्रता निश्चिती करून पात्र विजेत्यांकडून २०१८ पासून घराची विक्री रक्कम भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली. २०१८ ते २०२२ दरम्यान ९०० विजेत्यांनी घराची रक्कम भरली. मात्र त्यांना घराचा ताबा काही मिळाला नाही. ही घरे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करोना अलगीकरणासाठी घेण्यात आल्याने आणि नंतर ती वेळेत परत न केल्याने ताबा रखडला. घरे ताब्यात आल्यानंतर घरांच्या दुरूस्तीची गरज निर्माण झाल्याने दुरूस्तीच्या वादात ताबा रखडला. पण शेवटी म्हाडाने घराची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेत दुरूस्ती सुरू केली आणि २०२४ पासून विजेत्यांना ताबा देण्यास सुरुवात झाली.
तब्बल आठ वर्षांनी घराचा ताबा मिळाला पण ताबा घेताना मुंबई मंडळाने या घरांसाठी भरमसाट देखभाल शुल्क आकारले. सहा लाखाच्या ३२० चौ.फुटाच्या घरासाठी थेट वार्षिक ४२ हजार १३५ रुपये इतके देखभाल शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क भरमसाट असून त्यामुळे गिरणी कामगारांच्या आर्थिक अडचणी वाढत असल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर गिरणी कामगार आणि कामगार संघटनांनी देखभाल शुल्क कमी वा माफ करण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत २०१८ ते २०२२ दरम्यान घरांची रक्कम भरलेल्या विजेत्यांना देखभाल शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मुंबई मंडळाने ठेवला आहे. मंगळवारी या प्रस्तावावर चर्चा झाली आणि जयस्वाल यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याची माहिती म्हाडातील सुत्रांनी दिली. आता लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय घेत निर्णयाची अंमलबजावणी करत २०१८-२०२२ दरम्यान घराची रक्कम भरलेल्या ९०० कामगारांना देखभाल शुल्क माफी दिली जाणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
हेही वाचा…कांदिवली, बोरिवलीत गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवासमधील विजेत्यांनाही दिलासा
बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील ३,८९४ घरांच्या सोडतीतील विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेत ताबा देण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. मात्र अनेक विजेते असे आहेत की जे आर्थिक आणि इतर काही कारणांमुळे विहित मुदतीत घराची रक्कम भरु शकलेले नाहीत. तेव्हा अशा विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.