मुंबई : म्हाडाने सामाजिक बांधिलकी जपत ‘एमएमआर ग्रोथ हब’मध्ये गृहनिर्मितीसह वृद्ध आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ग्रोथ हब’मधील आठ लाख घरांच्या प्रारूप आराखड्यात यासंबंधीचा समावेश करण्यात आला आहे. आराखड्यानुसार म्हाडाचे मुंबई मंडळ मुंबईत तीन वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी सात वसतिगृहे बांधणार आहेत. तर, कोकण मंडळ मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) दोन वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी सहा वसतिगृहे बांधणार आहेत. उत्पन्न गटानुसार वसतिगृहे बांधली जाणार असून उच्च उत्पन्न गटातील नोकरदार महिलांसाठीच्या वसतिगृहात जलतरण तलाव, व्यायामशाळा यांसारख्या पंचतारांकित सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
निती आयोगाच्या शिफारशीनुसार मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाचा ‘ग्रोथ हब’ म्हणून विकास केला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्याचा आराखडा तयार केला आहे. याच ‘ग्रोथ हब’मध्ये ३० लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या ३० लाखांपैकी चार लाख घरांच्या निर्मितीची जबाबदारी म्हाडाकडे सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी आल्यानंतर म्हाडाने एका विशेष समितीची स्थापना करून यासाठीचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार म्हाडाने चार लाखांऐवजी आठ लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आघाडीच्या कंपन्यांची नियुक्ती
मुंबईत नोकरीच्या निमित्ताने राज्यातूनच नव्हे तर देशभरातून, परदेशातूनही मोठ्या संख्येने महिला येतात. अशा वेळी त्यांना निवासाची योग्य सोय उपलब्ध होईल. तर दुसरीकडे वृद्धांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हाडाने ‘ग्रोथ हब’मध्ये वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वसतिगृहे योग्यरीत्या चालवली जावीत यासाठी वसतिगृह चालविण्यासाठी प्रतिष्ठित आणि या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हैदराबाद, बंगळूरु येथील कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd