मुंबई : पुण्यातील पिंपरी परिसरात १७६ चौरस मीटर क्षेत्रफळाचा ३ बीएचके टेरेस फ्लॅट बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीद्वारे उपलब्ध झाली आहे. पुण्यातील पाच हजार ८६३ घरांच्या सोडतीत मंडळाने पाहिल्यांदाच चार टेरेस फ्लॅट विक्रीसाठी समाविष्ट केले आहेत. या घरांची किंमत एक कोटी ११ लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून या घरांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पुणे मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पुण्यातील पाच हजार ८६३ घरांसाठी मंगळवारपासून अर्ज विक्री – स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. या घरांसाठी १८ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून म्हाडाच्या मुंबईतील सदनिकांच्या किंमती लाखांचा टप्पा पार करत कोटींच्या घरात पोहोचल्या आहेत. मुंबई मंडळाच्या १४ ऑगस्टच्या सोडतीत एक कोटी रुपयांपासून थेट साडेसात कोटी रुपये किंमतीच्या सदनिकांचा समावेश होता. आता पुण्यातील म्हाडाच्या घरांच्या सोडतीतील घरांच्या किंमतीही एक कोटी रुपयांपार गेल्या आहेत. पुणे मंडळाच्या सोडतीत एक कोटी १० लाख ९५ हजार २०० आणि एक कोटी ११ लाख ६९ हजार ९०० रुपये किंमत असलेल्या काही घरांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे यात चार टेरेस फ्लॅट असून पहिल्यांदाच म्हाडाच्या सोडतीत टेरेस फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

हेही वाचा : हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पुणे मंडळाच्या पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील प्रकल्पातील तीन बीएचकेच्या ३७ घरांचा समावेश आहे. या ३७ सदनिकांपैकी चार टेरेस फ्लॅट पद्धतीची असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. दरम्यान, टेरेस फ्लॅट म्हटले की उंच इमारतीतील घर डोळ्यासमोर उभे राहते. पण पुणे मंडळाच्या सोडतीतील ही घरे मात्र याला अपवाद आहेत. ही घरे उंच इमारतीत नाहीत. या घरांना प्रशस्त गच्ची आहे. प्रशस्त आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या घरांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या परिसरात ७ ते ८ हजार प्रति चौरस फूट दर असताना म्हाडाने केवळ प्रति चौरस फूट पाच हजार ८०० चौरस फूट दर निश्चित केला आहे. त्यामुळे बाजारभावाच्या तुलनेत परवडणाऱ्या दरात ही घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.

Story img Loader