मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६,२९४ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून सुरुवात झाली असून पुणे, पिंपरी – चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील घरांचा या सोडतीत समावेश आहे.  पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते गुरूवारी अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेचा सुरुवात करण्यात आली. आता अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया, सोडतपूर्व प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर म्हणजे ५ डिसेंबर रोजी या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> Ratan Tata : “..त्यावेळी रतन टाटांनी खुर्चीतल्या मृतदेहाशी संवाद साधला आणि..”, राज ठाकरेंनी सांगितला भन्नाट किस्सा

पुणे मंडळाने सोडतीच्या धडका लावला आहे. पुणे मंडळाने २०२४ मध्येआतापर्यंत दोन सोडती यशस्वीपणे काढल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच मंडळाने तिसऱ्या सोडतीची घोषणा केली होती. त्यानुसार पुणे मंडळ क्षेत्रातील ६,२९४ घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस गुरुवारी दुपारी १२ पासून सुरुवात झाली असून अर्जदारांना अनामत रक्कम अदा करून अर्ज सादर करता येणार आहे. ही अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करण्याची मुदत १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपुष्टात येणार आहे. तर बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस वा एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करून १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्राप्त अर्जांची छाननी सुरू होईल.

हेही वाचा >>> वांद्रे येथील पटवर्धन उद्यानाखालील भूमिगत वाहनतळाचा प्रस्ताव रद्द

प्राप्त अर्जांची छाननी करून २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर पात्र अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जदारांच्या सूचना-हरकती सादर करून घेत ३० नोव्हेंबर रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुण्यात ५ डिसेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे मंडळाची ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये  म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत २,३४० सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील ४१८ सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३,३१२ सदनिकांचा समावेश आहे तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील १३१ सदनिकांचा समावेश आहे.