मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींजमधील रहिवाशांना अखेर कोकण मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. बोळींजमधील रहिवाशांची मागणी मान्य करून कोकण मंडळाने बोळींजमधील ९,४०९ सदनिकाधारकांच्या मासिक सेवाशुल्कात कपात केली आहे. या निर्णयानुसार आता अल्प गटासाठी १,४५० रुपये प्रति माह आणि मध्यम गटातील रहिवाशांसाठी २४०० रुपये प्रति माह सेवा शुल्क आकारले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण मंडळाने विरार-बोळींजमध्ये सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारला आहे. मात्र यात घरांचा दर्जा, अपुऱ्या सोयी-सुविधा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे या प्रकल्पातील हजारो घरे विक्रीविना रिक्त पडून आहेत. तर दुसरीकडे जी घरे विकली गेली आहेत, त्या घरांच्या लाभार्थ्यांमध्ये म्हाडा, कोकण मंडळाविषयी प्रचंड नाराजी आहे. या प्रकल्पातील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून येथे अनेक समस्यांना रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. आवश्यक त्या सोयी-सुविधा नसताना कोकण मंडळाने भरमसाठ सेवाशुल्क आकरल्याने रहिवाशांची नाराजी वाढली होती. त्यामुळे या सेवा शुल्काचा मुद्यावरून रहिवाशांनी अनेक वेळा आंदोलने केली होती. सेवाशुल्क न भरण्याची भूमिकाही रहिवाशांनी घेतली होती. रहिवाशांच्या आंदोलनानंतरही सेवाशुल्कात कपात होत नव्हती. तर दुसरीकडे ज्या सुविधांसाठी सेवाशुल्क आकारले जाते त्या पुरविण्याच्या दृष्टीनेही मंडळाकडून प्रयत्न केले जात नव्हते. त्यामुळे बोळींजमधील रहिवासी म्हाडाविरोधात अधिक आक्रमक झाले होते.

हेही वाचा >>> पावसामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा ; तापमानात घट

या रहिवाशांनी मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीच्या वेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना सेवाशुल्क कपातीचे निवेदन दिले. यावेळी सावे यांनी रहिवाशांच्या मागण्यांचा योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर सावे आणि म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यात एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सेवाशुल्कात कपात करण्याची रहिवाशांची मागणी मान्य करण्यात आली. बोळींज वसाहतीतील टप्पा क्रमांक १, २ आणि अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील आतापर्यंत ताबा घेतलेल्या आणि यापुढे ताबा घेणाऱ्या ९,४०९ सदनिकांधारकांचे सेवा शुल्क कमी करण्यात आले आहे. अल्प उत्पन्न गटातील सदनिकेसाठी प्रति माह २,१२१ रुपये, तर मध्यम उत्पन्न गटातील सदनिकेसाठी प्रति माह ३,४९३ रुपये असे सेवाशुल्क आकारले जात होते. पण आता मात्र म्हाडाच्या निर्णयानुसार अल्प गटातील सदनिकेसाठी प्रति माह १,४५०, तर मध्यम गटातील सदनिकेसाठी प्रति माह २,४०० रुपये सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबईतील वाहतुकीत आज बदल, कशामुळे आणि बदल कसे असतील वाचा…

सेवाशुल्क कपात करतानाच म्हाडाने रहिवाशांना आणखी एक दिलासा दिला आहे. करोना काळात, मार्च २०२० ते मार्च २०२२ या दोन वर्षांच्या कालावधीकरिता बोळींजमधील सदनिकांधारकांना सेवा शुल्कात काही सवलत देण्यात आली होती. या सवलतीनुसारच्या सेवाशुल्कातही अतिरिक्त ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे थकीत सेवाशुल्कांवरील विलंब शुल्कही म्हाडाकडून माफ करण्यात आले आहे. तर मूळ सेवाशुल्क भरण्याकरिता मार्च २०२५ पर्यंत मुभाही देण्यात आली असून यापुढील विलंब शुल्कातही सवलत देण्यात आली आहे. एप्रिल २०२५ पासून वार्षिक १८ चक्के दराने आकारण्यात येणारे विलंब शुल्क आता वार्षिक १२ टक्के दराने आकारण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada reduces maintenance charges for 9409 flat owners in virar bolinj colony mumbai print news zws