मुंबई : कांदिवली पश्चिम येथील चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासाठी पुढे आलेल्या विकासकाने रहिवाशांना २२ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळ देण्याची तयारी दाखविली होती. परंतु रहिवाशांनी स्वयंपुनर्विकासाचा मार्ग अवलंबिला आणि त्यांना ५५ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाचा लाभ मिळून ४०० व ६०० चौरस फुटांची घरे असलेल्या रहिवाशांना स्वयंपुनर्विकासात अनुक्रमे ८०० व १००० चौरस फुटाची घरे मिळाली आहेत. मुंबै बँकेचे दहा कोटींचे अर्थसहाय्य लाभलेला हा सातवा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाला आहे.

या प्रकल्पातील रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात दिल्या जाणार आहे. तीन वर्षांत ही इमारत उभी राहिली आहे. या गृहनिर्माण संस्थेतील मूळ १९ रहिवाशांनी १९८६ मध्ये म्हाडाकडून हा भूखंड विकत घेतला होता. स्वखर्चातून या रहिवाशांनी १९८८ मध्ये चारमजली इमारत उभी केली. या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे ठरले तेव्हा विकासकांनी तीन लाख रुपये कॉर्पस निधी आणि २२ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाचा प्रस्ताव दिला. मात्र रहिवाशांनी स्वयंपुनर्विकास करण्याचे ठरविले.

यासाठी हर्षद मोरे यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यानुसार बांधकाम व इतर तांत्रिक बाबी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराकडून तर लेखा व सदनिकांच्या विक्रीची जबाबदारी सहकारी संस्थेमार्फत सांभाळली जाणार होती. संस्थेचे विद्यमान सचिव अनिल सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतला. या काळात संस्थेपुढे अडचणी खूप आल्या. परंतु त्यावर मात करीत अखेर ही २२ मजली इमारत उभी राहिली. नव्या इमारतीत ५० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध झाल्या.

या सर्व सदनिकांची विक्री झाली असून आता या पैशातून मुंबै बँकेचे दहा कोटींचे कर्जही फेडले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ५५ कोटी रुपये खर्च आला. मात्र सदनिकांच्या विक्रीतून तो खर्च उभा राहिला आणि त्या व्यतिरिक्त तीन ते चार कोटी रुपये फायदा झाला असून तो कॉर्पस निधी स्वरुपात रहिवाशांमध्ये वाटण्यात येणार आहे. खासगी विकासकाने देऊन केलेल्या कॉर्पस निधीपेक्षा हा दोन ते तीन पट जादा आहे, याकडे हर्षद मोरे यांनी लक्ष वेधले. 

मुंबै बँकेकडून १४ इमारतींना अर्थसहाय्य

– मुंबै बँकेकडून आतापर्यंत १४ इमारतींना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यापैकी नवघर पूर्वरंग (मुलुंड पूर्व), अजित कुमार (गोरेगाव पूर्व), जयाकुंज आणि सुमसाम (बोरिवली पश्चिम), चित्रा (चेंबूर), नंदादीप (विलेपार्ले पूर्व) आणि चारकोप श्वेतांबरा (कांदिवली पूर्व) अशा सात सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास पूर्ण झाला आहे. या शिवाय शांताप्रभा (गोरेगाव पूर्व), चारकोप अभिलाषा, राकेश, ओरिअन (सर्व कांदिवली पश्चिम), नंदादीप (कूर्ला पूर्व), स्वयंभू (कांदिवली पूर्व), गोराई समाधान (बोरिवली पश्चिम) या सात प्रकल्पांचे काम सुरु आहे. यापैकी आठ म्हाडा इमापरती तर उर्वरित खासगी आहेत.

Story img Loader