मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला नऊ भूखंड विकासासाठी उपलब्ध झाले आहेत. त्या नऊपैकी चार भूखंडांवर २,३९४ घरे बांधली जाणार आहेत. मात्र आता मंडळाने उपलब्ध भूखंडांपैकी आर-५ भूखंडावर अनिवासी बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भूखंडावर २६ मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून त्यातील गाळ्यांची विक्री भविष्यात ई लिलाव पद्धतीने केली जाणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यासह या प्रकल्पाचे नियोजन करण्याचे काम सध्या मंडळाकडून सुरू आहे.
हेही वाचा >>> यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ डिजिटल; देशातील अन्य विद्यापीठांसाठी उपक्रम मार्गदर्शक
वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे वर्ग झाल्यानंतर मंडळाने अर्धवट अवस्थेतील पुनर्वसित इमारतींसह म्हाडाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचा समावेश असलेल्या इमारतीच्या कामाला सुरुवात केली. त्या दोन्ही इमारतींची कामे पूर्ण झाली असून आता केवळ निवासी दाखल्याची प्रतीक्षा आहे. उपलब्ध भूखंडावर अधिकाधिक गृहनिर्मिती करण्याचे म्हाडाने ठरवले असतानाच आता आर-५ भूखंडावर व्यावसायिक इमारत बांधण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार निर्णय घेत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
४० टक्के क्षेत्रांत व्यावसायिक इमारतीस मुभा
म्हाडा अभिन्यासाच्या पुनर्विकासाअंतर्गत अर्थात ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास करताना विकासासाठी उपलब्ध क्षेत्राच्या ६० क्षेत्रात अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटांसाठी गृहनिर्मिती करणे बंधनकारक आहे. तर उर्वरित ४० टक्के क्षेत्रात उच्च गटासाठी घरे बांधण्यासह व्यावसायिक इमारती बांधण्याची मुभा आहे. त्यानुसार विकासासाठी उपलब्ध जागेच्या ८ टक्के जागेचा वापर व्यावसायिक बांधकामासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हा प्रकल्प अगदी प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे तो नेमका कसा असेल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले. एकूणच आता गोरेगावमध्ये म्हाडाकडून व्यावसायिक इमारत उभारत यातील गाळे विक्रीसाठी भविष्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.