मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे पहाडी गोरेगाव येथील गृहप्रकल्पात प्रथमच ३५ मजली निवासी इमारत बांधली जात आहे. या गृहप्रकल्पात व्यायामशाळा, जलतरण तलाव, विजेवरील वाहनांसाठी चार्जिग स्थानक, मैदान इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. या घरांची किंमत ८० लाख रुपये ते सव्वा कोटी रुपयांदरम्यान असेल.
या निवास प्रकल्पात उच्च उत्पन्न गटासाठी १०५ आणि मध्यम उत्पन्न गटासाठी २२७ अशी एकूण ३३२ घरे असून त्यांचे १० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याच वर्षी घरांची सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाला २५ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर गोरेगाव येथे एक भूखंड उपलब्ध झाला आहे. मंडळातर्फे त्यावर गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. बांधकाम कंत्राटदार शिर्के कंपनीच्या माध्यमातून ३०१५ घरांची दोन टप्प्यांत बांधणी करण्यात येत आहे. भूखंड ‘अ’वर अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३२२.६० चौ. फुटांची १,२३९ घरे बांधण्यात येत असून भूखंड ‘ब’वर अत्यल्प गटासाठी ७०६, अल्प गटासाठी ७३६, मध्यम गटासाठी १०५ आणि उच्च गटासाठी २२७ घरे बांधण्यात येत आहेत. याच प्रकल्पातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांची १० टक्के कामे झाली असून ही घरे २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
वैशिष्टय़े काय?
* ३५ मजले अधिक तीन मजले पोडियम वाहनतळ असलेली इमारत.
* मध्यम गटासाठी ७९४.३१, तर उच्च गटासाठी ९७९.५८ चौरस फुटाची घरे.
* सज्जा, जलतरण तलाव, व्यायामशाळा, विद्युत वाहन चार्जिग स्थानक.
इतिहासात प्रथमच..
म्हाडाने २२ मजली निवासी इमारत बांधली आहे, मात्र या प्रकल्पात पहिल्यांदाच ३५ मजली इमारत बांधण्यात येत आहे. म्हाडाच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही इमारतीत सज्जा, जलतरण तलाव, व्यायामशाळा, विद्युत वाहन चार्जिग स्थानक अशा सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पण या प्रकल्पात उच्च आणि मध्यम गटासाठी या सर्व सुविधा आहेत.