मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील दोन हजार ५२१ घरांची सोडत लवकरच काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या घरांपैकी राजनोळी, ठाणे येथील मे. टाटा हौसिंग कंपनी लिमिटेड प्रकल्पातील एक हजार २४४ घरांची पुरती दुरवस्था झाली आहे. भिंती, दरवाजे खराब झाले असून काचाही फुटल्या आहेत. त्यामुळे आता या घरांची दुरुस्तीशिवाय सोडत काढण्यास गिरणी कामगार कृती समितीने विरोध केला आहे. घरांची दुरुस्ती करावी आणि मगच सोडत काढावी, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.
हेही वाचा >>> केंद्राच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’साठी मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता स्पर्धा
एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील घरे करोनाकाळात रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी विलगीकरणासाठी घेतली होती. दोन वर्षांच्या काळात या घरांची पुरती दुरवस्था झाली. घरांच्या देखभालीकडे जिल्हाधिकारी आणि स्थानिक महानगरपालिकांनी दुर्लक्ष केले. या घरांची दुरुस्ती न करताच ती एमएमआरडीएला परत करण्यात आली. तर एमएमआरडीएनेही खराब अवस्थेतील घरे म्हाडाकडे वर्ग केली. २ डिसेंबर २०१६ मध्ये काढण्यात आलेल्या कोन, पनवेल येथील दोन हजार ४१७ घरांचा आणि आगामी सोडतीतील दोन हजार ५२१ घरांचा समावेश आहे. दरम्यान, या घरांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र दुरुस्ती कोणी करायची आणि त्यासाठीचा खर्च कोण करणार यावरून एमएमआरडीए आणि म्हाडामध्ये वाद सुरू आहे. या वादात सोडत रखडली होती. पण आता दोन हजार ५२१ घरांसाठी सोडत काढण्याची तयारी मुंबई मंडळाची सुरू केली आहे. ही सोडत काढण्यापूर्वी घरांची पाहणी करण्याची मागणी गिरणी कामगार कृती समितीने केली होती. त्यानुसार नुकतीच समितीच्या शिष्टमंडळाने या घरांना भेट दिली. यावेळी दोन हजार ५२१ पैकी राजनोळी येथील एक हजार २४४ घरांची प्रचंड दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले. भिंतींचे प्लास्टर निघाले असून खिडक्यांची तावदाने, दरवाजे फुटल्याचे निदर्शनास आले. घरांमधील पंखे चोरीला गेले आहेत. एकूणच ही घरे दुरवस्थेत असून अशा घरांची सोडत काढण्यास विरोध असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. या घरांची दुरुस्ती केल्यानंतरच त्यांची सोडत काढावी अशी मागणी समितीने केली आहे. तर दुरुस्तीशिवाय ही घरे सोडतीत समाविष्ट होऊ देणार नाही, अशी भूमिका समितीने घेतली आहे.