निशांत सरवणकर, लोकसत्ता
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईमुळे वादग्रस्त ठरलेला गोरेगाव पश्चिम येथील पत्रा चाळ (सिद्धार्थ नगर) प्रकल्प आता ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ने (म्हाडा) मार्गी लावला असून या प्रकल्पात सामान्यांसाठी सोडतीत ४ हजार ७११ सदनिका मिळणार आहेत. याशिवाय भूखंडाच्या विक्रीतूनही म्हाडाला १७०० कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी या प्रकल्पात म्हाडाऐवजी विकासकाला भरघोस फायदा मिळणार होता.
या प्रकल्पासाठी म्हाडाने मे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीची नियुक्ती केली होती. मात्र, हा प्रकल्प स्वत: विकसित न करता मे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शनने आपल्या कंपनीत मे. हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या वाधवान बंधूंना संचालक म्हणून शिरकाव करू दिला. तेथूनच घोटाळयाची सुरुवात झाली होती.
हेही वाचा >>> औषधनिर्माण पदविकाधारकांना व्यवसायासाठी परीक्षा द्यावी लागणार
कंपनीने या प्रकल्पातील भूखंड नऊ विकासकांना विकून त्यापोटी एक हजार ९० कोटी रुपये मिळविले. याशिवाय मेडोज हा गृहप्रकल्प राबवून ४६५ सदनिकाधारकांकडून १३१ कोटी रुपये घेतले. मात्र, मूळ ६७२ रहिवाशांसाठी पुनर्वसनातील सदनिका बांधल्या नाहीत. या प्रकरणात वाधवान बंधूंना अटक झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला. अखेर राष्ट्रीय कंपनी लवाद तसेच उच्च न्यायालयात सुरू असलेल्या विविध दाव्यांमध्ये म्हाडाने हस्तक्षेप करून हा प्रकल्प पुन्हा आपल्याकडे घेतला. आता म्हाडाने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ६७२ रहिवाशांच्या इमारतींचे काम सुरू केले आहे. तसेच याच प्रकल्पातून आवश्यक निधीही उभा करण्याचे ठरविले आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी २५५६ सदनिका..
प्रकल्पातील आठ भूखंडांवर म्हाडाने सामान्यांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार चाचपणी करण्यात आली असून अल्प उत्पन्न गटासाठी २५५६, मध्यम उत्पन्न गटासाठी १२२४ तर उच्च उत्पन्न गटासाठी ९३१ अशी चार हजार ७११ घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे.